सुलेमानची भेट : अधिकाऱ्यांवरील दडपण दूरनागपूर : मृत्यू समोर उभा दिसत असतानाच त्याला टाळण्याचे सर्वच कायदेशीर उपायही संपल्यामुळे बॉम्बस्फोटाचा सूत्रधार याकूब अब्दुल रज्जाक मेमन (वय ५३) हताश झाला होता. मृत्यूच्या भीतीपोटी त्याने दोन दिवसांपासून खाणेपिणेही सोडले होते. त्याची ही अवस्था कारागृह प्रशासनावर प्रचंड दडपण निर्माण करणारी ठरली होती. फाशी देण्यापूर्वीच त्याला काही झाले तर... या प्रश्नाने कारागृह अधिकारी हादरले होते. त्यामुळे त्यांनी अखेरच्या रात्री याकूबला ‘राजी’ करण्यासाठी एक योजना आखली अन् त्यात कारागृह प्रशासन यशस्वीही ठरले. काय होती ही स्थिती अन् काय होती योजना त्याची एक्सक्लुसिव्ह माहिती खास लोकमतच्या वाचकांसाठी !ऐन जन्मदिवशीच मृत्यू येणार याची खात्री याकूबला आता पटली होती. नातेवाईकांनाही भेटता येणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने तो कमालीचा खचला होता. त्यात २९ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका अन् राज्यपालांनी दयेचा अर्ज फेटाळल्याचे वृत्त कळल्यामुळे याकूब पुरता कोलमडला. त्यामुळे त्याने २८ जुलैपासून खाणेपिणे सोडले होते. मृत्यूच्या उंबरठ्यावर असल्याची आणि प्रत्येक क्षणाला मृत्यूच्या जवळ जात असल्याची जाणीव झाल्यामुळे त्याच्या आरोग्यावर झपाट्याने विपरीत परिणाम होऊ लागला. त्याच्या नाडीची गती मंदावू लागली. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कारागृह अधिकाऱ्यांच्या माथ्यावर वळ्या पडू लागल्या होत्या. आणखी काही तास त्याने खाल्लेपिले नाही, तर याकूब अनफिट होऊ शकतो आणि तशा अवस्थेत त्याला फाशी दिली जाऊ शकत नसल्याची कल्पना आल्यामुळे फाशीच्या तयारीत गुंतलेल्या यंत्रणेतील शीर्षस्थ अधिकाऱ्यांनी विचारमंथन केले. त्यातून एक योजना पुढे आली. याकूबला स्वेच्छेने जेवू घालण्याचे ठरवण्यात आले. याकूब - सुलेमानची भेटभावाच्या ओढीने सकाळीच मुंबईहून नागपुरात आलेला सुलेमान बुधवारी सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास नागपूर कारागृहात पोहचला. कारागृह अधिकाऱ्यांजवळ त्याने याकूबची भेट घेऊ देण्याची विनंती केली. अधिकाऱ्यांनी भेट घडवून देण्याचे सहजपणे मान्य केले. सोबतच बुधवारी राष्ट्रपतींकडे नव्याने केलेल्या दयेच्या अर्जाचे काय झाले, त्याची विचारणा केली. आणखी काही कायदेशीर पर्याय स्वीकारणार आहेत काय, त्याबाबतही आस्थेने चौकशी केली. नंतर याकूबने खाणेपिणे सोडल्याचे सांगून त्याला जेवण घेण्यास सांगा, अशीही विनंती केली. त्यानुसार, सुलेमान याकूबला व्हिजिटर रुममध्ये भेटला. त्याची वास्तपुस्त केली. ‘तू हिंमत कशाला हरतो, अजून आपल्याकडे पर्याय आहेत‘, असा दिलासाही दिला. शेवटी तू जेवल्याशिवाय आम्हीही जेवणार नाही, असे याकूबला म्हटले. भावाच्या भेटीने सुखावलेल्या याकूबने ते मान्य केले.
हताश अन् निराश याकूब झाला राजी !
By admin | Published: July 31, 2015 2:32 AM