नागपूर : नागपूर शहरावर मान्सून फिदा आहे. आतापर्यंत ९६.२ टक्के पाऊस झाला; मात्र पेंच नदीवरील तोतलाडोह आणि कामठी खैरी जलाशयात आतापर्यंत ६५.६० टक्के आणि ५४.६९ टक्के पाण्याचाच साठा होऊ शकला आहे. मागील वर्षी या धरणांमध्ये ९४.७३ आणि ९७.३४ टक्के पाणी साठले होते. यामुळे नागपूरकरांना भरपावसाळ्यातच येत्या उन्हाळ्यातील पाणी टंचाईची चिंता ग्रासायला लागली आहे.
नागपुरात मान्सूनमध्ये ९५१.१ मिमी पाऊस पडतो. शहरात आतापर्यंत ९१४.९ मिमी पाऊस पडला आहे. ही टक्केवारी ९६.२ आहे. मागील वर्षी या तारखेपर्यंत ८८० मिमी (११२ टक्के) पाऊस झाला होता. दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात समाधानकारक पाऊस नाही. मान्सूनमध्ये जिल्ह्यात सरासरी ९२० मिमी पाऊस पडतो. आतापर्यंत ७८.६ टक्के म्हणजे ७२३ मिमी पाऊस पडला आहे. या आकड्यांची तुलना केली तर या काळात सरासरी ७७४ मिमी पाऊस पडतो. मात्र यंदा जून ते ४ सप्टेबर या काळात आतापर्यंत ७२३ मिमी पाऊस पडला आहे.
...
तोतलाडोह आणि कामठी खैरी चौरईवर अवलंबून
लगतच्या छिंदवाडा जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाच्या भरवशावरच पेंच नदीवरील तोतलाडोह आणि कामठी खैरी हे धरण अवलंबून आहे. छिंदवाडातील चौरई धरणही पेंच नदीवरच आहे. याची क्षमता ४२१.२ दशलक्ष घनमीटर असून, यात २५३.४० दशलक्ष घनमीटर (६०.१६ टक्के) पाणीसाठा आहे. चौरई धरण भरल्यावर पाणी सोडले जाते. ते तोतलाडोह आणि कामठी खैरीमध्ये पोहोचते. तोतलाडोहची क्षमता १०१६.८८ दशलक्ष घनमीटर आहे. येथे सध्या ६६७.०४ दशलक्ष घनमीटर पाणी आहे. कामठी खैरीची क्षमता १४१.९८ दशलक्ष घनमीटर असून, येथे सध्या ७७.६५ दशलक्ष घनमीटर पाणी आहे. ही जलाशये न भरल्याने नागपूर शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात होण्याची शक्यता बळावली आहे.
...
ढग दाटलेले, पण पाऊस नाही
नागपुरात शनिवारी दिवसभर आकाशात ढगांची दाटी होती; मात्र पाऊस पडला नाही. ढगाळ वातावरणामुळे तापमान २.५ अंश सेल्सिअसने खालावून ३१.४ अंश सेल्सिअसवर आले. रात्रीच्या तापमानातही १.५ ने घट होऊन २२.५ अंश सेल्सअस नोंद झाली. सकाळी ९५ टक्के असलेली आर्द्रता घटून सायंकाळी ८२ टक्क्यांवर गेली. शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ५.५ मिमी पावसाची नोंद झाली.