सुमेध वाघमारे
नागपूर : दोन्ही मूत्रपिंड (किडनी) निकामी झाल्याने मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्यांना त्यांचे जवळचे नातेवाईक आपले एक मूत्रपिंड दान करू इच्छितात. परंतु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञाअभावी तीन वर्षांपासून मूत्रपिंड प्रत्यारोपणच ठप्प पडले आहे. शेकडो रुग्ण किडनी दाता असून मृत्यूच्या दाढेत जगत आहेत.
राज्यात शासकीय रुग्णालय असलेल्या नागपूर मेडिकलच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच मूत्रपिंड प्रत्यारोपण सुरू झाले. फेब्रुवारी २०१६ मध्ये पहिल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून ते फेब्रुवारी २०२०पर्यंत ६८ रुग्णांवर मूत्रपिंड प्रत्यारोपण करून त्यांना जीवनदान देण्यात आले. या सर्व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात आल्याने गरीब रुग्णांना मोठा आधार मिळाला. रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी रुग्णांची गर्दी वाढली. मात्र, मार्च २०२०पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच शासनाने प्रत्यारोपणाला पुढे ढकलण्याचा सूचना केल्या. दरम्यानच्या काळात सोयीअभावी कंटाळून नेफ्रोलॉजी विभागाच्या प्रमुखांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. तेव्हापासून मूत्रपिंड प्रत्यारोपणच बंद पडले आहे.
-जाहिरात देऊनही नेफ्रोलॉजिस्ट मिळेना
प्राप्त माहितीनुसार, यावर्षी कोरोनाचा प्रभाव कमी होताच मेडिकल प्रशासनाने नेफ्रोलॉजिस्ट पद भरण्यासाठी जाहिरात काढली. एका तज्ज्ञाने होकारही दिला. परंतु ते रुजूच झाले नाहीत.
-रुग्णांची नोंदणीही बंद
विदर्भच नव्हे तर राज्यातील किडनी निकामी झालेल्या रुग्णांसाठी आशेचे किरण ठरलेल्या ‘सुपर’मधील मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्रात नाव नोंदविण्यासाठी रोज दोन ते तीन रुग्ण येतात. परंतु तज्ज्ञ डॉक्टरांअभावी नाव नोंदणीच बंद करण्यात आली आहे.
-४५०वर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत
अवयवदानाने एखाद्याला नवीन आयुष्य मिळू शकते. थांबलेले जगणे सुरू होऊ शकते. परंतु शहरात शासकीयसह ३०० वर मोठी खासगी हॉस्पिटल असताना किमान आठवड्यातून एकदाही ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत व्यक्तीची नोंद होत नाही. यामुळे कित्येक रुग्ण अवयवाच्या प्रतीक्षेत मृत्यूशी लढा देत आहेत. यात किडनीच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या ४५०वर गेली आहे.