लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कधी कुणी विचारही केला नसेल, अशा स्थितीचा सामना मोठ्यांपासून अगदी चिमुकल्यांना करावा लागत आहे. कोरोना संक्रमणामुळे मार्च २०२० पासून ते आतापर्यंत मुलांना शाळेपासून मुकावे लागले आहे. ऑनलाइनचा पर्याय सुरू असला तरी नव्याची नवलाई चार दिवस आणि त्यानंतर सुरू होता कंटाळा, अशी मुलांची स्थिती आहे. सुट्ट्यांचे, विशेषत: उन्हाळी सुट्ट्यांचे नवलच राहिले नाही, अशी स्थिती मुलांची आहे. ऑनलाइन अभ्यास, मोबाइल, टीव्ही, सिनेमा याचा कंटाळा आता स्पष्टपणे दिसायला लागला आहे. त्यामुळे, मुले आता जुन्या काळाकडे वळण्यास सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. घरातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात मुलांची कल्पकता जोर धरू लागली आहे.
कोरोना संक्रमणामुळे सलग दुसरा उन्हाळा लॉकडाऊनमध्ये चालला आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांना ऑनलाइन शिक्षणापासून उसंत मिळाली असली तरी घराबाहेर पडता येत नसल्याने उन्हाळी शिबिरांचाही लाभ घेता येत नाही आणि काका, मामा, आत्या, मावशीच्या गावालाही जाता येत नाही. मात्र, इच्छा तिथे मार्ग असते आणि तोच मार्ग मुलेही शोधत आहेत. घराघरातून हद्दपार झालेल्या पौराणिक कथा, ओल्ड कॉमिक्स आदींची उजळणी व्हायला लागली आहे. महाभारत, रामायण आदींच्या प्रत्येक व्यक्तिरेखा मुलांना आकर्षित करत असल्याने या कथांच्या छोट्या छोट्या पुस्तकांचे वाचन मुले करत आहेत. सोबतच यूट्युबवर बघून मुले पेपर क्राफ्ट, नवनवीन संकल्पना साकारण्याचे प्रयत्न करत आहेत. नव्या युगात हद्दपार झालेला आजीबाईचा बटवा मुलांना आकर्षित करत आहे आणि घरातील वृद्धांकडून त्याची उजळणी केली जात आहे. सोबतच पौराणिक विज्ञानकथांवरही मुले तुटून पडली आहेत.
---------------
कौटुंंबिक नात्यांना दिली जातेय ऑनलाइन संजीवनी
स्पर्धेच्या काळात आई-वडील दोघेही कमाईच्या मागे लागले असल्याने दूरवरच्या सोडाच अगदी जवळच्या नातेसंबंधांपासून अलिप्तता वाढीस लागली आहे. त्यामुळे मुलांना कौटुंबिक नातेसंबंधांची जाणीव नसते. गेल्या वर्षभरापासून स्पर्धाच संपली असल्याने, पालक टाळेबंदीत दुरावलेल्या नातेवाइकांशी संवाद वाढवत आहेत. याचा लाभ मुलांना होत आहे. व्हिडीओ कॉलने नाते आणि जाणीवा प्रगल्भ व्हायला लागल्या आहेत. एक प्रकारे नात्यांच्या दृढीकरणाला ऑनलाइन संजीवनी मिळत आहे.
--------------
ऑनलाइन शिबिर
प्रत्यक्ष शिबिर आता होणे शक्य नाही. किमान कोरोना संपेपर्यंत किंवा टाळेबंदी उठेपर्यंत तरी. अशा स्थितीत ऑनलाइन शिबिरे होत आहेत. मात्र, या शिबिरांना मर्यादा आहेत. नृत्य, नाट्य, चित्रकला, क्राफ्ट मेकिंग, गायन आदींच्या पलीकडे क्रीडा, स्विमिंग आजही बंद आहेत. मात्र, वेळ घालविण्यासाठी ऑनलाइन शिबिरांकडेही मुले वळत आहेत.
---------------
पौराणिक स्त्रियांचे कर्तृत्व जाणून घेतेय
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. यंदा मी विक्रम-वेताळावर आधारित सिंहासन बत्तीसी हे पुस्तक वाचून काढले. विक्रमादित्याचा पराक्रम आणि बुद्धिमत्ता यातून समजायला आली. सोबतच पौराणिक कर्तृत्ववान स्त्रियांची ओळख छोटेखानी पुस्तकांद्वारे करवून घेत आहे. यासाठी आई, बाबा आणि मामाची मदत घेत आहे.
- भूमी भोजापुरे (वय १० वर्षे)
------------------
मृदंगम शिकणे सुरू आहे
मला संगीताची आवड असल्याने मी तबला व मृदंगम शिकतो आहे. घरीच ऑनलाइन व गुरुजींच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण सुरू आहे. सोबतच जुन्या खेळांची ओळख करवून घेत आहे.
- श्लोक मस्के (वय १२ वर्षे)
----------------
पेपर क्राफ्ट व आजीबाईचा बटवा जाणून घेत आहे.
यूट्युबवर पेपर क्राफ्ट आणि इतर उपयुक्त गोष्टींची भरपूर माहिती असते. यावेळी आम्ही आई व मावशीच्या मार्गदर्शनात त्या वस्तू तयार करण्याचे प्रयत्न करत आहोत. सोबतच आजीकडून आजीबाईचा बटवा काय असतो, हे जाणून घेत आहोत. यात मजा येत आहे.
- ऐश्वर्या वानखडे व यादवी भाजे (वय १४ वर्षे)
.............