नागपूर : १५ डिसेंबरपासून एकत्रित कचरा स्वीकारू नका, ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित करा, असे निर्देश मनपा प्रशासनाने कचरा संकलन करणाऱ्या कंपन्यांना दिले होते. तसेच नागरिकांनाही घरातील कचरा वेगवेगळा करूनच द्यावा, असे आवाहन केले आहे. या आवाहनानंतरही जेमतेम ४० टक्केच कचऱ्याचे विलगीकरण होत आहे. आजही ६० टक्के नागपूरकर ओला व सुका कचरा एकत्रच देत आहेत. त्यामुळे तो वेगळा करायला मोठ्या अडचणी जात आहेत.
नागपूर शहरातून दररोज १,१०० मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. तो भांडेवाडी येथे साठविला जातो. यात ६० टक्के कचरा एकत्रित असतो. १५ ते ३१ डिसेंबरदरम्यान २१,१०० मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. यातील १२,७०० मेट्रिक टन कचऱ्याचे विलगीकरण झाले नव्हते. म्हणजेच जवळपास ६० टक्के कचरा विलगीकरण न करता भांडेवाडी येथे आणला जात आहे.
शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी बीव्हीजी व एजी एन्व्हायरो या दोन कंपन्यांकडे आहे. १५ दिवसात एजी एन्व्हायरो कंपनीने लक्ष्मी नगर, धरमपेठ, हनुमान नगर, धंतोली आणि नेहरू नगर झोन मधून १२,६९२ मेट्रिक टन कचरा भांडेवाडी येथे आणला. तर बीव्हीजी कंपनीने गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशी नगर आणि मंगळवारी झोन मधून १०,४५९ मेट्रिक टन कचरा उचलला. यातील ६,०६७ मेट्रिक टन कचरा मिश्रित होता. दोन्ही कंपन्याकडून १०० टक्के कचरा वेगवेगळा संकलित केला जात नाही.
सभागृहात पुन्हा मुद्दा गाजणार
कचरा संकलन कंपन्यांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी गठित समितीने चौकशी अहवाल महापौरांना सादर केला आहे. पुढील सभागृहात यावर पुन्हा चर्चा होणार आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित होत नसल्याचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता आहे.