लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजारांवर प्रतिबंध घातला आहे. त्या अनुषंगाने काचूरवाही (ता. रामटेक) येथे आठवडी बाजार भरणार नाही, अशी वारंवार सूचना देण्यात आली. मात्र, येथे आठवडी बाजार भरतच हाेता. साेमवारी (दि. १७) आठवडी बाजार भरताच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने लगेच पाेलिसांना कळविले आणि पाेलिसांनी बाजार गाठून भाजीपाला विक्रेत्यांना वेळीच पिटाळून लावले. एवढेच नव्हे तर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांसाेबतच मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली.
काचूरवाही येथे काेराेनाचे संक्रमण असून, काहींचा मृत्यूही झाला आहे. मात्र, येथील नागरिक त्यांचा बेजबाबदारपणा साेडायला तयार नाहीत. येथे आठवडी बाजार भरणार नाही, अशी सूचना ग्रामपंचायत प्रशासनाने दवंडीद्वारे अनेकदा दिली, तरीही येथे आठवडी बाजार भरवला जायचा. या बाजारात मास्क न वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे यासह अन्य बाबी प्रकर्षाने दिसून आल्या हाेत्या.
दरम्यान, साेमवारी काही भाजीपाला विक्रेत्यांनी त्यांची दुकाने थाटायला आणि ग्राहकांनी खरेदीसाठी या बाजारात यायला सुरुवात केली. ग्रामविकास अधिकारी समाधान वानखेडे यांनी विक्रेत्यांना नियमांचे पालन करण्याबाबत विनंती केली. मात्र, कुणीही ऐकत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पाेलिसांची मदत घेतली. पाेलिसांनी लगेच बाजार गाठून सर्व विक्रेत्यांना पिटाळून लावले. एवढेच नव्हे तर मास्क न वापरणाऱ्यांसह फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर दंडही ठाेठावला. या माेहिमेत सरपंच शैलेश राऊत, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर, गोरखनाथ निंबार्ते, दयाराम मोहनकार, प्रल्हाद सौकरे यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले हाेते.
...
ही माेहीम सुरू राहणार
दुसऱ्या टप्प्यात रामटेक तालुक्यातील बहुतांश तालुक्यात काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. त्यात काचूरवाहीचाही समावेश आहे. संक्रमण राेखण्यासाठी शासनाने काही उपाययाेजना सुचविल्या असून, त्यांचे पालन करण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, काचूरवाही येथे काेराेना संक्रमित रुग्णांचा मृत्यू हाेत असतानाही उपाययाेजनांची पायमल्ली केली जात आहे. हे संक्रमण राेखण्यासाठी दंडात्मक कारवाईची माेहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती सरपंच शैलेश राऊत व ग्रामविकास अधिकारी समाधान वानखेडे यांनी संयुक्तरीत्या दिली.