अडथळ्यांनंतरही महाविकास आघाडीने ‘वज्रमुठ’ आवळली; हजारोंची गर्दी, मैदान लहान पडले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 11:09 AM2023-04-17T11:09:04+5:302023-04-17T11:11:08+5:30
नेत्यांचा उत्साह अन् कार्यकर्त्यांची हिंमत वाढली
कमलेश वानखेडे - आनंद डेकाटे
नागपूर : महाविकास आघाडीच्या नागपुरात होऊ घातलेल्या सभेला दर्शन कॉलनीचे मैदान देण्यावरून भाजपने केलेला विरोध. स्थानिक नागरिकांच्या मदतीने न्यायालयात दिलेले आव्हान. अजित पवारांवरून निर्माण झालेला संभ्रम, असे एक ना अनेक अडथळे पार करीत अखेर महाविकास आघाडीने ‘वज्रमूठ’ आवळली. अपेक्षेनुसार सभेला हजारोंची गर्दी जमली. मैदानही लहान पडले. या सभेने महाविकास आघाडीच्या नेत्यांचा उत्साह वाढला अन् कार्यकर्त्यांची हिंमतही.
वज्रमूठ सभेच्या तयारीसाठी महाविकास आघाडीचे नेते सुरुवातीपासूनच तयारीला लागले होते. तीनही पक्षांच्या नेत्यांनी पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यांत बैठका घेतल्या. मात्र, सभा तोंडावर आली असताना सभेला मैदान देण्यावरून न्यायालयात आव्हान देण्यात आले. उच्च न्यायालयाने काही अटी घालत सभेला परवानगी दिली आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्धी लढाई येथेच जिंकली. सभेला भाजपकडून जेवढा विरोध होत गेला तेवढाच महाविकास आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांचा जोश वाढत गेला. विशेष म्हणजे ही तीन नव्हे एका पक्षाची सभा असल्यागत वातावरणनिर्मिती करण्यात नेत्यांना यश आले.
दुपारी कडाक्याचे ऊन असतानाही पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यांतील लोकांचे जत्थे दर्शन कॉलनी मैदानाच्या दिशेने येऊ लागले. ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांसह लोक उत्साहात सभास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रमाणात महिलांचाही समावेश होता. सायंकाळी ६ च्या सुमारास मैदान पूर्णपणे भरले. त्यामुळे अनेकांना मैदानापर्यंत पोहचता आले नाही. सभेला जमलेल्या गर्दीचे समाधान नेत्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील या नेत्यांनी सभेतील गर्दीचा आवर्जून उल्लेख करीत नागपूर- विदर्भातून देशात संदेश जात असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या सभेने राज्यात इतरत्र होऊ घातलेल्या वज्रमूठ सभांसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची हिंमत वाढविली. सभेच्या सुरुवातीला देशभक्ती, भीमगीते सादर करून उपस्थितांमध्ये उत्साह भरला गेला. या सभेसाठी लिहिलेले ‘वज्रमूठ’ गाणे चांगलेच गाजले.
उद्धव ठाकरेेच आकर्षण
- सभा महाविकास आघाडीची असली तरी सभेचे मुख्य आकर्षण हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच ठरले. उद्धव ठाकरे मंचावर आल्यावर, त्यांचे भाषण सुरू असताना टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा जयघोष केला जात होता.
युवक काँग्रेसने पेटविल्या मशाली
- सभा सुरू असताना युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पेटत्या मशाली घेऊन घोषणा देत दाखल झाले. माजी मंत्री सुनील केदार व विजय वडेट्टीवार यांनी या युवक कार्यकर्त्यांना हवा सुटली असल्याचे सांगत मशाल विझविण्याचे आवाहन केले. हजारोंच्या गर्दीत अशाप्रकारे मशाली पेटविल्यामुळे सभेनंतर काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
काँग्रेस, राष्ट्रवादीचे झेंडे, शिवसेनेचा फक्त भगवा
- तीनही पक्षांचे झेंडे लावून मैदान सजविण्यात आले होते. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या झेंड्यांवर पक्षाचे चिन्ह होते. मात्र, शिवसेनेचा झेंडा फक्त भगवा होता. त्यावर कुठलेही चिन्ह नव्हते. आपले चिन्ह चोरले, असे शिवसैनिक या भगव्या झेंड्याकडे पाहून संताप व्यक्त करीत होते.