नागपूर : उन्हाच्या काहिलीला वैदर्भीय त्रासले आहे. पारा अद्यापही ४२ अंशांवर आहे. असे असतानाही नागपूर जिल्ह्यात राज्य मंडळ वगळता इतर सीबीएसई बोर्डाच्या काही शाळा सुरू झाल्या आहेत. राज्य मंडळाच्या शाळा ३० जूनपासून सुरू होणार आहेत.
सध्या ऊन आणि आर्द्रतेने नागरिक बेचैन झाले आहेत. पंख्यांसोबतच कुलरची हवाही आराम देत नाहीये, तर दुसरीकडे अनेक शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सीबीएसईच्या शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी माध्यमिक वर्ग सुरू झाले आहेत. काही ठिकाणी सकाळी सातची पाळी, तर काही ठिकाणी सकाळी दहापासून शाळा सुरू करण्यात आली आहे.
२० एप्रिलला शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात राज्य मंडळाच्या शाळा ३० जूनपासून सुरू होतील, असे म्हटले होते. इतर मंडळांच्या शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम सुरू केले तरच त्याबाबतचा निर्णय शालेय स्तरावर घेता येईल. महत्त्वाचे प्रकल्प सुरू झाल्यानंतरच इतर मंडळांच्या शाळा सुरू करता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे असले तरी शाळा नियमित सुरू झाल्याचे दिसून येते.
- शैक्षणिक सत्रात एकसूत्रता असावी
शाळा सुरू झाल्यावर अनेक पालकांनी विरोधही केला आहे. विदर्भातील सर्वच शहरांचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. शाळांच्या खोल्यांमध्ये दोन-तीन पंखे आहेत. उष्ण हवेमुळे चक्कर येते. या स्थितीत आतापासून शाळा सुरू करण्याचे कोणतेही औचित्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे. काही शाळा सुरू झाल्या असल्या तरी उपस्थिती सामान्य नाही. अनेक पालक सहलीसाठी बाहेरगावी गेले आहेत. या स्थितीत या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होणार आहे. काही दिवस पावसासोबतच उष्माही कमी होणार आहे. मग शाळा सुरू व्हायला हव्या होत्या. बोर्ड जरी वेगवेगळे असले तरी विद्यार्थी मात्र एकच आहेत. शाळांच्या शैक्षणिक सत्रात एकसूत्रता असावी. जेणेकरून विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळू शकेल.
- सीबीएसईच्या ९० टक्के शाळा २६ जूनपासून
सीबीएसईच्या ९० टक्के शाळा या २६ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण विभागाची रीतसर परवानगी घेण्यात येणार आहे.
इतर मंडळांच्या शाळा केवळ महत्त्वाच्या शैक्षणिक उपक्रमांसाठीच सुरू करू शकतात. त्यानुसार काहीजणांनी शाळा सुरू केल्या असल्या तरी ३० पर्यंत शाळा सुरू करू, असे अनेकांनी सांगितले आहे. असे असले तरी राज्य बोर्डाच्या शाळा ३० तारखेलाच सुरू होतील.
- रवींद्र काटोलकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), नागपूर.