नागपूर : हत्तीरोग डास चावल्याने संक्रमीत होणारा रोग आहे. या आजारात मृत्यू होत नसला तरी बाह्य अवयवावर सूज येऊन विकृती येते. हत्तीरोग सामुदायीक औषधोपचार मोहिमेत देण्यात येणाऱ्या औषधामुळे हत्तीपाय व अंडवृद्धी पासून बचाव करता येतो. शिवाय, पोटातील धोकादायक इतरही जंतूचा नाशकरुन खरुज व डोक्यातील उवांचाही नाश करते, अशा स्वरुपातील जनजागृती केली जात असल्याने मोहिमेला यश येत असल्याचे दिसून येत आहे. मागील चार दिवसांतच नागपूर ग्रामीण भागातील सहा तालुक्यांमध्ये २ लाख ५९ हजार ५९१ पात्र लाभार्थांनी हत्तीरोग विरोधी गोळ्यांचे सेवन केले आहे. २१ टक्क्यांपर्यंत उदिष्ट साद्य झाले आहे.
शरीराचा कोणताही लोंबणारा भाग हा हत्तीरोगाने संक्रमीत असू शकतो. हत्तीरोगाची लक्षणे हातापायावर सूज ( हत्तीपाय), पुरुषामध्ये वृषणदाह (अंडवृद्धी), स्त्रीयांमध्ये स्तनवृद्धी, जननइंद्रियावर सूज येते. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नागपूर जिल्ह्यात १७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान हत्तीरोग दुरीकरण करण्याकरिता हत्तीरोग सामुदायीक औषधोपचार मोहिम राबविण्यात येत आहे.
हिंगणा, नागपूर, कामठी, कुही, उमरेड, भिवापूर या कार्यक्षेत्रात त्रिगुणी औषधोपचार मोहिमे अंतर्गत हत्तीरोग विरोधी डी. ई.सी., अॅलब्नेडाझोल, आयवरमेक्टीन गोळयांचा उपचार समक्ष करण्यात येत आहे. या मोहिमेत २ वर्षा वरील सर्व लाभार्थांना वयोगटा नूसार व उंची नुसार गोळ्या खाऊ घालण्यात येत आहे. सदर मोहिमेत खासगी शाळा, खासगी महाविद्यालय, खासगी दवाखाने, शासकीय दवाखाने, डब्लयू.सी.एल., सहकारी बँक, सरकारी बँक, या ठिकाणी बूथ लावून प्रत्यक्ष गोळा खाऊ घालण्यात आल्या आहे.
या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ताताई कोकड्डे यांनी हत्तीरोग विरोधी गोळ्यांचे सेवन करून केला. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी सुद्धा गोळ्यांचे सेवन केले. आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, सहाय्यक संचालक (हिवताप) डॉ. श्यामसुंदर निमगडे या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात हत्तीरोग दुरीकरण २०२३ ची यशस्वीतेकडे वाटचाल सुरू आहे. ३१ ऑगस्टपर्यंत १२ लाख ३० हजार ३५२ लोकांना औषधी खाऊ घालण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.