व्यापाऱ्यांसह शासनाचीही फसवणूक : एकाला अटक, साथीदार फरार नागपूर : सनदी लेखापालांकडे (सीए) वहीखाते लिहिणाऱ्या एका तरुणाने अनेक व्यापाऱ्यांना सीए बनून गंडा घातला. ही बाब उघड झाल्यानंतर मनोज त्र्यंबकराव दुधाने (रा. गरोबा मैदान) याला लकडगंज पोलिसांनी अटक केली. त्याचा साथीदार विजय गणपतराव चन्ने (रा. शेषनगर) फरार आहे. कॉमर्सचा स्नातक असलेला मनोज एका सीएकडे वहीखाते लिहिण्याचे काम करीत होता. आर्थिक वर्षअखेर व्यापारी आॅडिट करवून घेत प्राप्तिकर खात्याकडे रिटर्न जमा करतात. त्याची पद्धत माहीत असल्यामुळे मनोज आणि त्याच्या साथीदाराने व्यापाऱ्यांना गंडविण्याचा कट रचला. नीरज अरविंद निमजे (सोनेगाव) नामक सीएच्या नावाने बनावट रबर स्टॅम्प आणि कागदपत्रे जमवून त्यांनी व्यापाऱ्यांशी जवळीक साधली. त्यांचे आॅडिट रिपोर्ट तसेच रिटर्न प्राप्तिकर आणि विक्रीकर विभागात जमा करू लागले. निमजे यांना या गैरप्रकाराची कुणकुण लागली. त्यामुळे त्यांनी आपल्या नावाने शासकीय विभागात जमा करण्यात आलेल्या आॅडिट रिपोर्ट आणि रिटर्नची माहिती मिळविली. अनेक व्यापाऱ्यांची त्यातून नावे समोर आली. त्यामुळे निमजेंनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मनोज दुधानेला अटक केली. त्याने या गैरकृत्यात चन्नेचाही सहभाग असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीस त्याच्या घरी पोहचले. परंतु त्याला पोलीस कारवाईची कुणकुण लागल्याने चन्ने फरार झाला. (प्रतिनिधी) अडीच वर्षांपासून गोरखधंदा बनावट सही, शिक्के मारून कागदपत्रे तयार करायचा आणि फीच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून रक्कम घेण्याचा दुधाने आणि चन्नेचा गोरखधंदा अडीच वर्षांपासून सुरू आहे. १५ जानेवारी २०१४ ते १२ जानेवारी २०१६ या कालावधीत त्यांनी सुमारे २४ व्यापाऱ्यांचे आॅडिट रिपोर्ट आणि रिटर्न जमा केल्याचेही उघड झाले आहे.