नागपूर : निवडणूकपूर्व वर्ष असल्याने प्रभागातील विकास कामासाठी सत्ताधाऱ्यांचा आग्रह आहे. मात्र कोरोना संकटामुळे महापालिकेला आर्थिक फटका बसला. अशा परिस्थितीत कठोर आर्थिक शिस्त पर्याय नाही. त्यात कोणतीही करवाढ नसलेला, नवीन कामांना प्राधान्य न देता प्रलंबित दायित्वाचा भार कमी केला जाणार आहे. शहरातील रस्ते, पथदिवे, शिक्षण, आरोग्य सेवा, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, फूटपाथ व पथदिवे अशा नागरी सुविधांना प्राधान्य व विकास चक्राला गती देणारा मनपाचा २०२१-२२ या वर्षाचा २६०७.६० कोटींचा अर्थसंकल्प बुधवारी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांना समितीच्या बैठकीत सादर केला.
स्थायी समितीने महापालिकेचे २०२०-२१ या वर्षात २७९७.७३ कोटींचे उत्पन्न गृहित धरले होते. मात्र, प्रत्यक्ष उत्पन्नाचा विचार करता याला आयुक्तांनी ३६४.०१ कोटींची कात्री लावली आहे. २४३३.६३ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प दिला. २०१९-२० या वर्षात तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २६२४.०५ कोटींचा अर्थसंकल्प दिला होता. त्यातुलनेत राधाकृष्णन बी. यांनी १६.४५ कोटींनी कमी रकमेचा अर्थसंकल्प दिला. वास्तव उत्पन्न गृहित धरल्याने उत्पन्न कमी दिसत असले तरी, महापालिकेच्या कारभाराला यातून शिस्त लागण्यास मदत होणार आहे.
सन २०२०-२१ या वर्षात आयुक्तांनी अर्थसंकल्पात उत्पन्न २१६९.५९ कोटी गृहीत धरले आहे. तर सुरुवातीची २६४.०४ कोटींची शिल्लक गृहित धरून सुधारित उत्पन्न २४३३.६३ कोटी राहील, तर खर्च २४३३.०९ कोटी राहील. २०२०-२१ या वर्षात परिवहन विभागासाठी १०८ तर २०२१-२२ या वर्षातही १०८ कोटी उपलब्ध करण्यात आले आहे.
...
नवीन कर नाही, दायित्व कमी करणार
कोणतीही करवाढ न करता भांडवली खर्चासाठी १२०९.३० कोटींची तरतूद केली आहे. अमृत योजना, नाग नदी संवर्धन, सिमेंट रोड, पथदिवे यासह आवश्यक कामावर खर्च केला जाणार आहे. शहरातील विकास कामांसोबतच केंद्र व राज्य सरकारच्या प्रकल्पांना गती देण्याचा संकल्प आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. नवीन कामांना प्राधान्य न देता प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी प्रशासनाला आर्थिक शिस्त लावण्याचा संकल्प आयुक्तांनी व्यक्त केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे आदी उपस्थित होते.
...
वर्ष २०२१-२२ मधील प्रस्तावित उत्पन्न (कोटी)
शीर्षक उत्पन्न
महसुली व भांडवली अनुदान १७२२.६९
मालमत्ता कर ३३२.४८
पाणी कर १९५.००
नगर रचना १०६.८७
अन्य उत्पन्न २५०.५६
....
वर्ष २०२०-२१ मधील प्रस्तावित खर्च
शीर्षक खर्च
आस्थापना खर्च ५१९.१६
सेवानिवृत्ती वेतन २००.००
प्रशासकीय खर्च ८६.८७
दुरुस्ती खर्च ४१२.७७
आर्थिक अंशदान १७९.७९
भांडवली खर्च १२०९.३०
शेवटची शिल्लक २५.५६