मिशन डायरेक्टर कुणाल कुमार यांचे निर्देश : पारडी भागात केला दौरा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून विकसित केल्या जाणाऱ्या पूर्व नागपुरातील भरतवाडा, पुनापूर, पारडी व भांडेवाडी परिसरातील विकास कामासोबतच उद्योग, रुग्णालय व बाजारपेठ विकसित करण्याचे निर्देश केंद्र शासनाच्या गृहनिर्माण शहरी विकास मंत्रालयाचे सहसचिव आणि स्मार्ट सिटी मिशनचे डायरेक्टर कुणाल कुमार यांनी गुरुवारी दिले.
कुणाल कुमार यांनी पूर्व नागपूरचा दौरा करून नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने सुरू असलेल्या विकास कामाची पाहणी केली. यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. उपस्थित होते.
कुणाल कुमार यांनी श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरला भेट देऊन माहिती घेतली. नागपूर सेफ अॅन्ड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपुरात ३,६०० कॅमेरे लावण्यात आले आहेत. या लाईव्ह कॅमेऱ्याच्या माध्यमाने वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून केली जाणारी कारवाई नागपूर सिटी लाईव्ह अॅपच्या माध्यमाने नागरिकांची तक्रार सोडविण्याच्या पद्धतीबद्दल राधाकृष्णन बी. यांनी माहिती दिली.
कुणाल कुमार यांनी इंडिया सायकल फार चेंज चॅलेंज, सीताबर्डी बाजारपेठ ‘ओपन स्ट्रीट व्हेईकल फ्री झोन’ बायोडायव्हर्सिटी मॅप, शहराच्या भूजलाची पातळीबद्दल माहिती घेतली. उप मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, कंपनी सेक्रेटरी भानुप्रिया ठाकूर, महाव्यवस्थापक (मोबिलिटी/इन्फ्रास्ट्रक्चर)राजेश दुफारे, ई-गव्हर्नन्स विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. शील घुले आदी उपस्थित होते.
...
५१ किमीचे सिमेंट रोड
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्व नागपुरातील मागासलेल्या भागात क्षेत्राधिष्ठित विकास केला जात आहे. ५१ किमी लांबीचे सिमेंट रोड, पाण्याची टाकी आणि विस्थापित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी गृहनिर्माणचे काम हाती घेतले आहे. भुवनेश्वरी एस. यांनी कळमना-पावनगाव रस्ता, पाण्याची टाकी आणि होम स्वीट होम गृहनिर्माण प्रकल्पाच्या साईटवर जाऊन विकास कामाची माहिती दिली.