एम.एस. उन्नीकृष्णन : ‘व्हीएनआयटी’चा १४ वा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला नागपूर : आपल्या देशात तांत्रिक व विज्ञान संस्थांचा आकडा गेल्या काही काळात वाढलेला आहे. परंतु शैक्षणिक व संशोधनाच्या पातळीवर या संस्थांमध्ये हवी तशी प्रगती झालेली नाही. या संस्थांचा यादृष्टीने विकास होणे आवश्यक आहे. जर असे झाले नाही तर जगातील महासत्ता होण्याचे स्वप्न पूर्णत्वास जाणार नाही, असे परखड मत ‘थरमॅक्स’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस उन्नीकृष्णन यांनी केले. ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरैया नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १४व्या दीक्षांत समारंभात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाला ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार, संचालक डॉ.नरेंद्र चौधरी, कुलसचिव एस.आर.साठे व निरनिराळ्या शाखांचे अधिष्ठाता प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या देशात नागरिकांमध्ये एकता आहे आणि मनुष्यबळ ही आपली शक्ती आहे. याचा योग्य उपयोग करण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशाला पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर विकासाचा शाश्वत मार्ग अवलंबला गेला पाहिजे. यासाठी ऊर्जा, संशोधन, औद्योगिकीकरण, कृषी आणि सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल करावा लागणार आहे. आपल्या देशात आजही बऱ्याच मूलभूत समस्या सुटलेल्या नाहीत. या समस्यांवर संशोधनातूनच तोडगा निघू शकतो. अभियंत्यांनी केवळ स्वत:च्या करिअरचा विचार न करता, देशाचे आधारस्तंभ व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अभियंता दिनाचे औचित्य साधून संस्थेच्यावतीने दीक्षान्त समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. नरेंद्र चौधरी यांनी पदवीदान करण्याअगोदर ‘डायरेक्टर्स रिपोर्ट’ सादर केला. (प्रतिनिधी) १,१३९ विद्यार्थ्यांना पदवीदान दीक्षांत समारोहात एकूण १ हजार १३९ विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात आले. संस्थेचे संचालक डॉ. नरेंद्र चौधरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. यात ४९ विद्यार्थ्यांना आचार्य पदवी, ३३२ विद्यार्थ्यांना ‘एमटेक’, ५३ विद्यार्थ्यांना ‘एमएससी’ तर ६४७ विद्यार्थ्यांना बी.टेक पदवी प्रदान करण्यात आली. दरवर्षी ‘व्हीएनआयटी’तील सर्व विभागातून सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्याचा सर विश्वेश्वरैया पदक देऊन सन्मान करण्यात येतो. यंदा संगणकशास्त्र अभियांत्रिकी विभागातील शेख मोहम्मद दानिश या विद्यार्थ्याला या पदकाने सन्मानित करण्यात आले. तर स्थापत्यशास्त्र विभागातील इद्रिस मुस्तफा मनकीबवाला या विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त पारितोषिकांनी सन्मान झाला. यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी गौरव हिराणी याला त्याच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल हेमंत करकरे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परिश्रमाचे फळ : इद्रिस मुस्तफा मनाकिबवाला यंंदाच्या दीक्षांत समारंभात सर्वाधिक पुरस्कार प्राप्त करणाऱ्या इद्रिस मुस्तफा मनाकिबवाला याने कधीही अभ्यासाचा दबाव घेतला नसल्याचे स्पष्ट केले. माझ्यावर कधीही अभ्यासाचा दबाव नव्हता. एखादा विषय केवळ परीक्षेपुरता न शिकता त्याच्या ‘बेसिक’वर मी लक्ष दिले. त्यामुळे कुठलाही मुद्दा फारसा अडला नाही, असे त्याने सांगितले. प्रामाणिक परिश्रम केले की त्याचे फळ मिळतेच, असे तो म्हणाला. मूळचा इंदोरचा असलेला इद्रिस सध्या पुण्यात कार्यरत आहे. ‘मायनिंग’मधील देशातील पहिली महिला ‘पीएचडी’ ‘मायनिंग’ अभियांत्रिकी या विषयात ‘पीएचडी’ करण्याचे प्रमाण फारसे नाही. अशा स्थितीत चंद्राणी प्रसाद वर्मा यांनी या विषयात ‘पीएचडी’ केली आहे. विशेष म्हणजे चंद्राणी या विषयात ‘पीएचडी’ करणारी देशातील पहिल्या महिला ठरल्या आहेत हे विशेष. कठोर परिश्रमातून मिळाले यश : शेख मोहम्मद दानिश बी.टेक.च्या संगणक अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी शेख मोहम्मद दानिश याचा सर विश्वेश्वरैय्या पदकाने सन्मान करण्यात आला. सुरुवातीचे काही महिने मला खडतर वाटले होते. यशासाठी कठोर परिश्रम करावेच लागतील हे तेव्हा लक्षात आले. कुटुंबापासून दूर असल्यामुळे घरची ओढ होती. परंतु काहीतरी करूनच परत जायचे असे ठरविले होते. सुवर्णपदक मिळेल अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे मिळालेल्या यशाचा आनंद द्विगुणित झाला आहे, असे मत त्याने व्यक्त केले. दानिश सध्या एका खासगी कंपनीत कार्यरत आहे. वडिलांचे स्वप्न केले पूर्ण : गौरव हिराणी कोल्हापूरच्या मातीतील असलेल्या गौरव हिराणीच्या वडिलांना अभियांत्रिकीचे शिक्षण अर्ध्यातच सोडावे लागले होते. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. पुढे जाऊन मला प्रशासकीय सेवेत जायचे आहे. त्यादृष्टीने मी प्रयत्न करत आहे. देशसेवेचा हा उत्तम मार्ग असल्याचे मला वाटते, असे गौरव म्हणाला. विविध अभ्यासक्रमांचे टॉपर्स शाखा नाव मेकॅनिकल गौरव हिराणी केमिकल वेंकटेश काटकर सिव्हिल इद्रिस मुस्तफा मनाकिबवाला कॉम्प्युटर सायन्स शेख मोहम्मद दानिश इलेक्ट्रिकल चंद्रगिरी विष्णूवर्धन रेड्डी इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन होनी गुप्ता मेटालर्जिकल अॅन्ड मटेलिअल अमजद अली गेसावत मायनिंग अमिश कुमार आर्किटेक्चर निवेदिता मेहरोत्रा
संशोधनाच्या पातळीवर विकास व्हावा
By admin | Published: September 16, 2016 3:22 AM