सरन्यायाधीश शरद बोबडे : महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन
- न्यायमूर्ती भूषण गवई विद्यापीठाचे कुलपती होणार
नागपूर : न्यायव्यवस्था हा लोकशाही व्यवस्थेचा अतिशय महत्त्वाचा स्तंभ आहे. तो मजबूत करण्यासाठी उत्तम दर्जाच्या विधी शिक्षणाची आवश्यकता असून येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठ त्या दृष्टीने महत्त्वाचे आणि जागतिक दर्जाचे ठरणार आहे. राष्ट्रीय दृष्टिकोन आणि चारित्र्य विकसित करण्यासाठी हे विद्यापीठ निश्चितच महत्त्वाचे योगदान देईल, असा आशावाद देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.
शहराजवळच्या वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश तथा या विद्यापीठाचे संस्थापक कुलपती शरद बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नागपूर नितीन राऊत, ऊर्जा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. विजेंद्रकुमार आदी उपस्थित होते.
प्रारंभी विधी विद्यापीठाच्या निर्मितीमागचा ओझरता प्रवास सरन्यायाधीश बोबडे यांनी मांडला. न्यायमूर्ती भूषण गवई हे या विधी विद्यापीठाचे कुलपती असतील, असे त्यांनी जाहीर केले. या विद्यापीठातून राष्ट्रीय दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होणार आहे. कारण देशभरातील प्राध्यापक आणि विद्यार्थी येथे अध्ययन-अध्यापन करणार आहेत. ऑक्सफर्ड- हॉर्वर्ड-केंम्ब्रिज या विद्यापीठाच्या तोडीचे विद्यापीठ ठरणार आहे. न्यायशास्त्र अभ्यासक्रमाचा समावेश, हे या विद्यापीठाचे दुसरे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले.
गडकरी म्हणाले, विधी क्षेत्रात गुणात्मक बदल व्हावा, त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यापीठ उभारावे या उद्देशाने या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. जागतिक दर्जाच्या सुविधा असलेले हे विद्यापीठ असून यातून सर्वोत्कृष्ट न्यायाधीश व विधिज्ञ घडावेत, अशी अपेक्षा न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी व्यक्त केली. पालकमंत्री डॉ.राऊत यांनी विद्यापीठाची ही इमारत आणि परिसरातील इतर काम अतिशय कठीण अशा कोविड काळात करण्यात यश आल्याचे समाधान व्यक्त केले. लोकशाही मूल्य प्रस्थापित होण्यासाठी कायद्याचे राज्य गरजेचे आहे. तर कायद्याच्या राज्यासाठी मजबूत न्यायव्यवस्था आवश्यक आहे त्यासाठी हे विद्यापीठ मोठे योगदान देईल, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. समतेची शिकवण देणाऱ्या दीक्षाभूमीच्या शहरात विधी विद्यापीठ स्थापन होणे हे आनंददायी असल्याचे मत न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन यावेळी करण्यात आले.
प्रास्ताविक प्रा.आशिष सिंग यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रा. सी. रमेशकुमार यांनी मानले. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्हि.एस. सिरपूरकर यांची यावेळी उपस्थिती होती.
महाराष्ट्राला न्यायदानाची आदर्श परंपरा लाभली :मुख्यमंत्री
कायद्याची चौकट पाळणाऱ्या महाराष्ट्राला न्यायदानाची मोठी आणि आदर्श परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातही न्यायदानाची परंपरा अत्यंत आदर्शवत होती. रामशास्त्री प्रभुणेंसारख्या न्यायदात्यांनी ती पुढे चालवली. लोकशाहीत चार स्तंभाची भूमिका महत्त्वाची असते. त्यातून लोकशाहीला मजबूत आधार मिळत असतो, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. लोकशाहीचे छत समर्थपणे तोलून धरणारे वकील, विधिज्ञ या विद्यापीठात घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.