रामटेक : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या रामटेक तालुका समितीच्या वतीने एमपीएससी परीक्षा, नवीन पदभरती व शिक्षण- रोजगाराच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रामटेक येथील नायब तहसीलदारामार्फत निवेदन दिले. याप्रसंगी स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येला जबाबदार एमपीएससी व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. राज्य सरकारने आतापर्यंत घेण्यात आलेल्या सर्व एमपीएससी परीक्षांची पूर्तता करावी. तसेच दिलेल्या आश्वासनानुसार आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त जागांवर ३१ जुलैपर्यंत नियुक्ती करण्यात यावी, सरकारी विभागातील सर्व भरत्या एमपीएससीच्या माध्यमातून करण्यात याव्या. शासकीय विभागातील भरतीसाठी महापोर्टल बंद करावे. सरकारी विभागासाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेची खासगी एजन्सींच्या माध्यमातून करणे बंद करावे. यासोबतच विविध सरकारी विभागामधील सर्व रिक्त जागा घोषित कराव्यात. विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून काढून टाकणाऱ्या खासगी शाळांचा परवाना सरकारने रद्द करावा, आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात संघटनेचे राज्य समिती सदस्य अमित हटवार, तालुका अध्यक्ष संदेश रामटेके, राम येलके, संघर्ष हटवार, सुरज दुनडे यांचा समावेश होता.
नवीन पदभरती व शिक्षणाबाबत धोरण आखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:07 AM