नागपूर : शेकडो ग्राहक व पुसद सहकारी बँकेला फसविल्याचा आरोप असलेला डेव्हलपर यशवंत माधव इंगळे याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला. इंगळेविरुद्ध ठोस पुरावे असून प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळे त्याला अटकपूर्व जामीन दिला जाऊ शकत नाही, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले.
न्यायमूर्ती विनय जोशी यांनी हा निर्णय दिला. इंगळेविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी २६ एप्रिल २०१९ रोजी गुन्हा नोंदवला आहे. इंगळेने २००४ मध्ये मौजा पेवठा व बनवाडी येथील जमिनीवर ले-आऊट टाकण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अकृषक परवानगी मिळवली. त्यानंतर त्याने संबंधित जमिनीवर ले-आऊट टाकले पण, ते ले-आऊट नगर रचना विभागाकडून मंजूर करून घेतले नाही. तसेच, त्या ले-आऊटमधील भूखंड शेकडो ग्राहकांना विकले. त्यानंतर त्याने संबंधित जमीन पुसद नागरी सहकारी बँकेत गहाण ठेवून चार कोटी रुपयाचे कर्ज उचलले. त्याने या कर्जाची परतफेड केली नाही. दरम्यान, ग्राहकांना इंगळेचा हा गैरप्रकार कळल्यानंतर त्यांनी बँकेला माहिती दिली. त्यामुळे बँकेनेही इंगळेविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली. इंगळे एवढ्यावरच थांबला नाही. त्याने आधीच विकलेल्या काही भूखंडांची अन्य ग्राहकांना दुसऱ्यांदा विक्री केली असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता इंगळेला दणका दिला. सरकारतर्फे ॲड. एम. जे. खान तर, ग्राहकांतर्फे ॲड. नीरज जावडे व ॲड. डी. बी. भोवते यांनी कामकाज पाहिले.