लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर राज्याची उपराजधानी असली तरी भविष्यातील ‘रायझिंग कॅपिटल’ची पुरेपूर क्षमता त्यात आहे. नागपूरचे भौगोलिक स्थान हे एक वेगळे बलस्थान विविध अंगांनी मध्य भारतातील सर्वच राज्यांसाठी ते उपयोगाचे आहे. इतवारी नागपूर मध्य भारतातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. नववर्षात उपराजधानीतील सर्वच बाजारपेठांचा आधुनिक स्तरावर विकास होण्याची गरज आहे.बाजारपेठांमध्ये पार्किंगची आवश्यकताइतवारी, गांधीबाग, मस्कासाथ, सराफा या विदर्भातील सर्वात जुन्या बाजारपेठा आहेत. पूर्वीच्या लोकसंख्येच्या तुलनेत या बाजारपेठा ग्राहकांसाठी सोयीच्या होत्या. नागपूरचा विकास होतानाच त्या त्या वस्त्यांमध्ये बाजारपेठांचा विकास झाला. याशिवाय वाहनांच्या कोंडीमुळे पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला. आता इतवारी व मस्कासाथ बाजारात चारचाकी तर सोडाच साधी दुचाकी सहजरीत्या रस्त्यावरून चालविणे जोखमीचे काम आहे. वाहतूक वाढली, बाजाराचा विकास झाला पण रस्ते तसेच आहेत. सरकारने नवीन जागेवर एकत्रितरीत्या सर्वच बाजारपेठांचा विकास करण्याची गरज आहे. त्यामुळे ग्राहकांनाही खरेदीसाठी सोयीची जागा उपलब्ध होईल.इतवारी किराणा बाजारपेठेसाठी शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात ९ एकर जागा दिली आहे. पण शासनाने ही जागा किराणा असोसिएशनच्या ताब्यात अजूनही दिलेली नाही. इतवारीतून किराणा व्यावसायिक या ठिकाणी स्थलांतरित झाल्यास तयार होणाऱ्या एकत्रित बाजारपेठांमुळे व्यावसायिकांचा विकास होईल आणि ग्राहकांनाही सोयीचे ठरेल. याकरिता शासनाला पुढाकार घेण्याची गरज आहे.
- इतवारी किराणा बाजारपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात न्यावी.
- शासनाने मंजूर केलेल्या जागेचा ताबा व्यावसायिकांना द्यावा.
- इतवारी आणि मस्कासाथ रस्त्याचे रुंदीकरण व्हावे.
- मस्कासाथ आणि इतवारी भागातील अतिक्रमण हटवावे.
- गारमेंट हब तयार करून कापड व्यापाऱ्यांना एकत्रित आणावे.
- प्रत्येक दुकान कॉम्प्लेक्सच्या आत व त्याचे पार्किंग व्यवस्थित असावे.
- पुढील दहा वर्षांच्या ग्राहकसंख्येनुसार नियोजन व्हावे.
शिवप्रताप सिंह, सचिव, इतवारी किराणा असोसिएशन.
- सराफा बाजार एकाच ठिकाणी तयार करून संघटित करावा.
- पूर्वीच्या तुलनेत रस्ते रुंद करण्याची गरज.
- वाहनांसाठी मनपाने पार्किंगची व्यवस्था करावी.
- नवीन शोरुम, दुकानाचे बांधकाम नकाशानुसारच बांधावे.
- सराफा बाजार आधुनिक स्तरावर असावा.
- बाजारपेठा वाट्टेल तशा वाढू नयेत, त्यांच्या जागा निश्चित असाव्यात.
पुरुषोत्तम कावळे, उपाध्यक्ष, सोना-चांदी ओळ कमिटी.ग्राहक सर्वेक्षणातून हवे बाजारपेठांचे नियोजन‘जेथे रस्ता, तेथे दुकान’ ही वैदर्भीयांची मानसिकताच झाली असल्याने इतवारी, गांधीबाग, सक्करदरा, गोकुळपेठ, सीताबर्डी, धरमपेठ, जरीपटका अशा विविध भागात बाजारपेठा निर्माण झाल्या, परंतु त्या आज अनियंत्रित व अविकसित आहेत. पुढील १० ते १५ वर्षांत ग्राहकसंख्या किती व कशी वाढेल, याचा अंदाज घेऊन बाजारपेठांची जागा निश्चित व्हावी. या जागा सर्व सोईसुविधांनी सज्ज असाव्यात. स्थानिक प्रशासन अर्थात मनपाने आजवर बाजारपेठांचा विचारच न केल्याने त्या अनियंत्रित झाल्या आणि पार्किंगची समस्या निर्माण झाली. खरेदीला येणाऱ्या ग्राहकाला चिंतामुक्त राहून खरेदीचा आनंद मिळावा, यासाठी मोठ्या नियोजनाची गरज आहे. नागपूरला खऱ्या अर्थाने विकसित करायचे असल्यास शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठांचे नियोजन आतापासूनच सुयोग्य पद्धतीने करावे लागेल. याची सुरुवात सन २०२० च्या सुरुवातीपासूनच व्हावी, अशी अपेक्षा आहे.