नागपूरचा विकास हे बेरोजगारांना फसविण्याचे कुरण; हायकोर्टाचे परखड निरीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 11:06 AM2019-09-06T11:06:44+5:302019-09-06T11:07:15+5:30
नागपूर शहराच्या विकासाने बेईमान लोकांसाठी बेरोजगारांना फसविणारे कुरण तयार करण्याचे मार्ग मोकळे केले आहेत, असे परखड मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी एका महिला आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना व्यक्त केले.
राकेश घानोडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराच्या विकासाने बेईमान लोकांसाठी बेरोजगारांना फसविणारे कुरण तयार करण्याचे मार्ग मोकळे केले आहेत. हे बेईमान लोक नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांची लाखो रुपयांनी फसवणूक करीत आहेत, असे परखड मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी एका महिला आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना व्यक्त केले.
देशाच्या इतर शहरांप्रमाणे नागपुरातही बेरोजगारांची कमतरता नाही. ते रोजगार मिळविण्यासाठी सतत उत्सुक असतात. त्यातून अवैध आर्थिक मागण्या पूर्ण करण्याचीही त्यांची तयारी असते. पैसे दिल्यानंतर त्यांना नोकरी मिळत नाही. तेव्हा ते पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवतात. अशा गुन्ह्यांमध्ये नेहमीच व्हाईट कॉलर लोक सामील असतात. ते असे गुन्हे कधीच एकट्याने करीत नाहीत. सामूहिक यंत्रणा तयार करून बेरोजगारांना फसविले जाते. त्या यंत्रणेला समाजाद्वारे रॅकेट संबोधले जाते. हे रॅकेट शार्क माशाप्रमाणे कार्य करते. ते नोकरीच्या आमिषाला भुलून पैसे देण्याची तयारी असलेल्या बेरोजगारांना हेरून त्यांचा घास घेते, असे मत न्यायालयाने पुढे नोंदवले.
नागपूर मेट्रो रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार युवकाला फसविणारी नंदनवन येथील आरोपी रंजना प्रभाकर आदमने (४०) हिने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने वरीलप्रमाणे निरीक्षण नोंदवून तिचा अर्ज फेटाळून लावला. यापूर्वी २० जुलै २०१९ रोजी सत्र न्यायालयाने तिला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. त्यामुळे तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. २४ आॅक्टोबर २०१८ रोजी हुडकेश्वर पोलिसांनी आर्थिक फसवणूक झालेले चंद्रशेखर उकेश यांच्या तक्रारीवरून आदमनेसह इतर आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६५, ४६८, ४६९, ४७१, ४७३, ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
बेरोजगारांची ८० लाखांनी फसवणूक
सरकारच्या प्रतिज्ञापत्रानुसार, या प्रकरणातील आरोपींनी बेरोजगार युवकांची सुमारे ८० लाख रुपयांनी फसवणूक केली आहे. ते बेरोजगारांना १२ ते १५ लाख रुपये मागत होते. आरोपी प्रशांत हेडाऊ याच्या घरी सापडलेल्या डायरीत बेरोजगारांकडून घेतलेल्या रकमेच्या नोंदी आहेत. मुख्य आरोपी रवी सत्यकुमार फरार आहे. तो हैदराबाद येथील रहिवासी आहे. त्याच्याकडे सर्व रक्कम आहे. न्यायालयात राज्य सरकारतर्फे अॅड. नितीन रोडे यांनी कामकाज पाहिले.