आठ वर्षांत अदाणी-अंबानींचाच विकास; भाजपने देश विकायला काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2023 05:05 PM2023-01-25T17:05:45+5:302023-01-25T17:06:12+5:30
Nagpur News भाजपने तर देश विकायला काढला आहे. देशात मागील आठ वर्षांत केवळ पंतप्रधान मोदी यांचे मित्र अदाणी-अंबानी यांचाच विकास झाल्याचा आरोप उत्तर प्रदेश विधिमंडळ काँग्रेस नेत्या आराधना मिश्रा यांनी बुधवारी येथे केला.
नागपूर : जगातील तिसरी अर्थव्यवस्था असा टेंभा मिरविणाऱ्या भाजपने या देशाची धुळधाण केली आहे. देशाच्या विकासाचा पाया माजी पंतप्रधान दिवंगत पं. जवाहरलाल नेहरूंनीच रचला आहे. भाजपने तर देश विकायला काढला आहे. देशात मागील आठ वर्षांत केवळ पंतप्रधान मोदी यांचे मित्र अदाणी-अंबानी यांचाच विकास झाल्याचा आरोप उत्तर प्रदेश विधिमंडळ काँग्रेस नेत्या आराधना मिश्रा यांनी बुधवारी येथे केला. काँग्रेसच्या 'हाथ से हाथ जोडो' अभियानासाठी त्या नागपुरात आल्या असता पत्रपरिषदेत बोलत होत्या.
२०१४ मध्ये १० टक्के श्रीमंतांकडे ६४ टक्के संपत्ती होती. आता ५० टक्के संपत्ती ५ टक्के धनधांडग्यांकडे आहे. बंदरे, विमानतळ, रेल्वे, वीज उत्पादन केंद्र, कोळसा खाणी मित्रांना खैरात म्हणून वाटल्या. बंदरांमध्ये अरबो रुपयांचे जप्त होणारे ड्रग्जचे व्यवहार कोणाचे, असा सवालही त्यांनी यावेळी केला. दरवर्षी दोन कोटींचे रोजगार कुठे आहेत. दहा लाख सरकारी नोकऱ्या रिक्त असताना नोटाबंदी व कोरोनामुळे नोकऱ्या हिसकावल्या. महागाई, रोजगार आज अत्युच्च शिखरावर आहे. यासारखे मुख्य मुद्दे भरकटविण्यासाठीच भाजप वेगवेगळे मुद्दे पुढे करते, असा आरोपही त्यांनी केला.
- कार्यकर्ते घरोघरी जातील
भारत जोडो यात्रेचा एक भाग म्हणून आज, २६ जानेवारीपासून देशभरात काँग्रेसचे 'हाथ से हाथ जोडो' अभियान सुरू होत आहे. राज्य, जिल्हा व ब्लॉक स्तरावर एकाचवेळी हे अभियान सुरू होत आहे. नकारात्मक राजकारणाला प्रेम, एकतेचे प्रत्युत्तर म्हणून भारत जोडो यात्रा होती. यात तरुण, महिला, वृद्ध व मुलेही सहभागी झाली. काँग्रेसशी संबंधित नसणारे दिल्लीतील २७ हजार नागरिक यात्रेत होते. आता कार्यकर्त्यांची वेळ आहे. घरोघरी जाऊन देशातील ज्वलंत प्रश्न, काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी तीन वर्षांत केलेले काम व आगामी दोन वर्षांतील प्रस्तावित कामे मांडून नागरिकांचे जिवाभावाचे प्रश्न या अभियानातून सोडविण्यावर भर दिला जाणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.