नागपूर : अजनी रेल्वे स्टेशनचा सॅटेलाइट टर्मिनल म्हणून विकास केला जात असून, चार नवीन प्लॅटफॉर्मसह ४५.३३ कोटींच्या खर्चाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. या नवीन कामाच्या पूर्ततेमुळे नागपूर परिसरातील रेल्वे गाड्यांची गतिशीलता सुधारेल आणि ट्रॅफिक रेंगाळण्याचे काम कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
वर्ड क्लास स्टेशन बनविण्याच्या हेतूने अजनी स्टेशनच्या विविध कामांचा धडाका सुरू आहे. आतापर्यंत ५८५ मीटरपैकी ५२० मीटर लांबीची पिट लाइनचे काम पूर्ण झाले आहे. यार्डशी ट्रॅक जोडण्याचे काम धडाक्यात सुरू असून ६०० मीटरपैकी ३०० मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मच्या नाल्याचे काम पूर्ण झाले आहे. ४ स्टेबलिंग लाइनपैकी प्रत्येकी ४०० मीटर लांबीचे ट्रॅक लिंकिंग पूर्ण झाले आहे. या शिवाय सर्व सिव्हिल काम, नवीन प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्मवर कव्हरशेड, वॉशिंग पिट लाइन, स्टॅबल लाइन, कोच वॉटरिंग पाथवे, सर्व्हिस बिल्डिंग इत्यादींसाठी सर्व कंत्राटे देण्यात आली असून, ओएचई (ओव्हरहेड इक्विपमेंट) आणि इलेक्ट्रिकलच्या कामाच्याही निविदा देण्यात आल्या. सर्व सेवा इमारतीचे यांत्रिक काम असे एकूण ३० टक्के काम पूर्ण झाले असून सिग्नलिंग आणि दूरसंचार उल्लंघनाचा अडथळा दूर करण्याचे काम सुरू आहे.
सर्वच कामांना गतीसध्या अजनी स्थानकात ३ प्लॅटफॉर्म आहेत. तर २६ कोच लांबीचे ४ नवीन प्लॅटफॉर्म बांधण्याचे नियोजित आहे. दुय्यम देखभाल सुविधेसह ४ नवीन स्टेबलिंग लाइन्सचे बांधकाम, रेल्वे परीक्षणासाठी १ नवीन पिट लाइनचे बांधकाम, प्लॅटफॉर्मवर ५०० मीटरच्या कव्हर शेडचे बांधकाम, कोचमध्ये पाणी पिण्याची सुविधा निर्माण करणे आणि नवीन प्रस्तावित प्लॅटफॉर्मला जोडण्यासाठी २ नवीन फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) बांधण्याच्या कामांना गती दिली जात आहे.