वसीम कुरैशी
नागपूर : चार वर्षांपूर्वी केंद्राने ‘उडान’ योजनेंतर्गत लहान विमानतळाच्या विकासाचे कार्य सुरू केले. मात्र, महाराष्ट्रासह विदर्भातील काही लहान विमानतळाचे विकास कार्य अजूनही आटोपलेले नाही. परवानगी मिळालेल्या विमानतळाच्या कामांना सुरुवातही झालेली नाही. आतापर्यंत तरी नागपुरातून आरसीएस फ्लाईटचे संचालन सुरू झालेले नाही.
२००७ मध्ये अमरावती येथे बेलोरा विमानतळाचा प्रस्ताव होता. या कामाची सुरुवातही झाली. परंतु, अद्याप काम पूर्ण झालेले नाही. सत्तापरिवर्तन होत गेले. मात्र, कार्यपूर्ती झालेली नाही. चार वर्षांपूर्वी या विमानतळाच्या रनवे व बाऊंड्री वॉलचे काम मंदगतीने सुरू झाले. मात्र, अडीच वर्षांपासून ते काम ठप्प पडले आहे. त्यामुळेच येथे टर्मिनल बिल्डिंगचे काम सुरू होऊ शकलेले नाही.
चंद्रपूर येथील राजुरा येथे नव्या विमानतळाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी अडीच वर्षांपूर्वी येथे ५३० एकर जमीन घेण्यात आली. शिवाय, १५० एकर जमीन आणखी हवी आहे. राजुरा विमानतळासंदर्भात अद्याप कोणताच आराखडा तयार झालेला नाही. त्यामुळे, विमानतळासंदर्भातील डिझाईनही बनलेले नाही. या विमानतळासाठी केंद्राकडून मंजूर झालेल्या ५२ कोटी रुपये निधीपैकी ६.५ कोटी निधी प्राप्त झाल्याने कामास सुरुवात होणार असल्याचे सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार स्पष्ट होत आहे. यासोबतच राज्य शासनाकडून २३ कोटी रुपयेही उपलब्ध केले जाणार आहे. यासोबतच अमरावती एअरपोर्टवरून नोव्हेंबर महिन्यापासून फ्लाईटचे संचालन होणार असल्याचा दावा केला जात आहे.
२५० पॅसेंजर हॅण्डलिंगसाठी प्रस्तावित विमानतळ
अमरावती येथील बेलोरा व चंद्रपूरमध्ये प्रस्तावित राजुरा विमानतळ एटीआर ७२ सीटर विमानाच्या संचालनाच्या अनुषंगाने तयार केले जाणार आहेत. यासाठी तयार करण्यात येणारी टर्मिनल बिल्डिंग एकावेळी २५० प्रवाशांचे नियोजन करू शकणार असल्याचे सूत्र सांगत आहे. मात्र, अजूनही पायाभूत कामे सुरू झाली नसल्याने हे दावे केवळ स्वप्नवत ठरत आहेत.
लहान विमानतळाचा विकास व्हावा
वर्तमानात कोणत्याही उद्योगासाठी व क्षेत्राच्या विकासासाठी विमानसेवा आवश्यक असून, त्याच दिशेने जिल्हास्तरावर विमानाचे संचालन व्हावे, असे आमचे प्रयत्न आहेत. ज्या जिल्ह्यात विमानतळ नाहीत, तेथे किमान लहान विमानाच्या संचालनाच्या दृष्टीने विकास होणे गरजेचे आहे.
- ललित गांधी, प्रदेश अध्यक्ष : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स
.......