ऑफलाईन मनपा सभेच्या परवानगीसाठी फडणवीसांना पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील दोन वर्षापासून शहरातील विकास कामे ठप्प आहेत. प्रभागातील गडर लाईन, रस्ते, चेंबर दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याने नगरसेवकांविषयी नागरिकांत प्रचंड रोष आहे. कामे होत नसल्याने नगरसेवकांत नैराश्येची भावना आहे. त्यात पुढील वर्षात निवडणुकीला सामोरे जायचे आहे. अशा परिस्थितीत नगरसेकांना प्रभागातील समस्या मांडता याव्यात, यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी मिळवून द्यावी, अशी मागणी सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.
सन १९१९-२० या कालावधीत प्रदीप पोहाणे स्थायी समिती अध्यक्ष असताना त्यांनी मनपाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने फाईल बनविता आल्या नाहीत. नोव्हेंबर महिन्यात फाईल बनविण्याला सुरुवात झाली. परंतु राज्यात सत्तांतर झाले. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बिकट आर्थिक परिस्थिती पुढे करून विकास कामे थांबविली. नंतर कोविड-१९ ची संचारबंदी सुरू झाली.
२०२०-२१ वर्षाचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी सादर केला. परंतु कोरोना महामारीचे कारण पुढे करून आयुक्तांनी अर्थसंकल्पातील प्रस्तावित कामे थांबविली. सलग दोन वर्षे विकास कामे ठप्प आहेत. मनपाच्या सभा ऑनलाईन होत असल्याने नगरसेकांना समस्या मांडता येत नाहीत. प्रशासनाला जाब विचारता येत नाही. प्रशासनाकडून नगरसेवकांच्या मागण्यांची दखल घेतली जात नाही. याचा विचार करता, ऑफलाईन सभा घेण्याची शासनाकडून मंजुरी मिळवून द्यावी, अशी मागणी अविनाश ठाकरे यांनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.