लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला जंगलातील पाणस्थळावर वन्यप्राण्यांची प्रगणना केली जाते. पारंपरिक पद्धतीने करण्यात येत असलेल्या या पाणस्थळावरील वन्यप्राण्यांच्या प्रगणनेबाबत अनेक भ्रम आहेत. त्यामुळे यंदाही ही प्रगणना ७ व ८ मे रोजी ‘निसर्गानुभव’ म्हणून केली जाणार आहे.यासंदर्भात वन विभागाने हा निर्णय घेताना दरवर्षीच्या पद्धतीच्या अंमलबजावणीचे स्वरूप लक्षात घेता शास्त्रीयदृष्ट्या ही तितकीशी उपयोगी नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शास्त्रीयदृष्ट्या पाणस्थळावरील प्रगणना करण्याचा आग्रह वैज्ञानिक संस्थेकडून करण्यात येत नाही.पाणस्थळावरील प्रगणना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पूर्वतयारी करावी लागते. मात्र यात वनविभाग व बाहेरील वन्यजीव अभ्यासक तसेच वन्यजीव अभ्यासक संस्थांचा सहभाग लक्षात घेता, ही पारंपरिक पद्धत सुरू ठेवण्याचा आग्रह होत आहे. वन्यजीवांच्या सामूहिक अभ्यासाच्या दृष्टीने ही पद्धत उपयोगाची असल्याने ही सुरू ठेवण्यासंदर्भात या घटकांचा आग्रह आहे. त्यामुळे यावर्षीदेखील बुद्ध पौर्णिमेला ७ व ८ मे रोजी पाणस्थळावरील वन्यप्राण्यांची प्रगणना होणार आहे. मात्र वन्यप्राण्यांचा अंदाज हा निसर्ग अनुभव म्हणून आयोजित करण्याचे वनविभागाने यावेळी निश्चित केले आहे.केंद्रीय पर्यावरण व वन विभागाने घालून दिलेल्या पद्धतीनुसार आॅक्टोबर २०१९ ते मे २०२० या काळात कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात तसेच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्राबाहेर वाघांची किमान संख्या निश्चित करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. वाघांच्या संख्येचा अंदाज घेण्यासाठी राष्ट्रीयस्तरावर निश्चित केलेल्या पद्धतीचा वापर देशभर सुरू आहे. दर चार वर्षांनी होणाऱ्या या अखिल भारतीय व्याघ्र प्रगणनेमध्ये वाघासोबतच त्यांच्या भक्ष्यांचा अंदाजसुद्धा घेतला जातो.दरम्यान, विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एस. बी. भलावी यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, यंदा होणारी पाणस्थळावरील प्रगणना सर्व ठिकाणी बंधनकारक राहणार नाही. मात्र संबंधित क्षेत्राच्या व्यवस्थापन आराखड्यात प्रगणना करण्याचे निश्चित केले असल्यास ती करावी, असे म्हटले आहे. अर्थात पाणस्थळावरील वन्यप्राण्यांची प्रगणना हा पूर्णत: निसर्गानुभव राहणार आहे. यामध्ये वन्यजीव अभ्यासक तसेच वन विभागातील अधिकाऱ्यांनादेखील सहभागी होण्याची संधी आहे. यासाठी संबंधित वन विभागाच्या कार्यालयाकडे २५ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची संधी आहे.