लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आर्थिक स्थिती बिकट असल्याने स्थायी समितीने मंजुरी दिलेली व कार्यादेश झालेल्या विकासकामांना दीड वर्षापूर्वी मनपाचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ब्रेक लावला होता. त्यानंतर आलेले कोरोना संकट अजूनही कायम असल्याने काही मोजकी कामे वगळता विकासकामे ठप्प असल्याने महापालिकेतील कंत्राटदार अडचणीत आले आहेत. दुसरीकडे ९ ते १० हजार कामगारांचा रोजगार बुडाला.
मनपात २५० च्या आसपास कंत्राटदार आहेत. त्यांच्याकडे ९ ते १० हजार कामगार काम करतात. शहरातील रस्ते, सिमेंट रोड,पाईपलाईन, नाले दुरुस्ती, पावसाळी नाल्या, समाज भवन, इमारत बांधकाम अशा स्वरुपाची कामे करतात. कोरोना संकटामुळे काही मोजकीच कामे वगळता विकासकामे ठप्पच आहेत.
...
लाख- दोन लाखांच्या फाईल थांबल्या
प्रभागातील गडर लाईन, चेंबर दुरुस्ती, नाल्या दुरुस्ती अशा लहान-सहान कामांसाठी लाख-दोन लाखांच्या फाईल निधीअभावी थांबल्या आहेत.यामुळे नागरिक त्रस्त आहेत. मनपाची आर्थिक स्थिती बिकट असली तरी अत्यावश्यक कामांसाठी निधी उपलब्ध करणे शक्य नाही. इतकी वाईट अवस्था निश्चितच नाही.
....
मागील वर्षातील बिल प्रलंबित
कंत्राटदारांची मागील वर्षातील ५० ते ६० कोटींची बिले अजूनही प्रलंबित आहेत.जुने बिल मिळत नसल्याने नवीन कामे कशी करणार असा प्रश्न कंत्राटदारांना पडला आहे. परिणाम निविदा काढल्या तरी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
...
साहित्याचे दर प्रचंड वाढले
बांधकाम साहित्याचे दर प्रचंड वाढले आहेत. सिमेंटची २५० रुपयाला मिळणारी गोणी आज ४५० रुपयांवर गेली आहे. लोखंड, रेती व अन्य साहित्याचे दर वाढले आहेत. परंतु निविदात दर जुने असल्याने या दरात काम करणे परवडत नसल्याने कामासाठी कंत्राटदारही फारसे इच्छुक नसल्याची माहिती कंत्राटदारांनी दिली.
....
कोरोनाच्या धास्तीमुळे कामगार गावी गेले
नागपुरातील कंत्राटदारांकडे प्रामुख्याने मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील कामगार काम करतात. लॉकडाऊन कालावधीत काही कंत्राटदारांनी कामगारांना धान्य व आर्थिक मदत केली. परंतु दुसऱ्या लाटेत पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण झाली. कामगार गावी गेले. ते कोरोनाच्या धास्तीमुळे अजूनही परत आलेले नाही. जुलै महिन्यात परततील अशी माहिती कंत्राटदारांनी दिली.
....
गडकरींना निवेदन देणार
दीड वर्षापासून काही मोजकी कामे वगळता मनपाची कामे ठप्प आहेत. गेल्या वर्षातील मे -जून महिन्यातील बिल अजूनही मिळालेले नाही. दुसरीकडे कोरोना संकटामुळे कामगार गावी गेले आहेत. त्यामुळे कंत्राटदार अडचणीत आहेत. त्यात साहित्याचे दर वाढले आहेत. सिमेंटची गोणी २५० रुपयाला मिळत होती. ती आता ४५० रुपयाला मिळते. रेती, गिट्टी, लोखंड अशा बांधकाम साहित्याचे दर कमी करावेत, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मनपा कंत्राटदार संघटनेचे शिष्टमंडळ भेटणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विजय नायडू यांनी दिले.