लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकीकडे लोकसभा निवडणुकांच्या निकालांचा भाजपाच्या गोटात उत्साह असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी तृतीय वर्ष वर्गामध्ये व्यस्त दिसून आले. डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात निकालांच्या दिवशीच संघाच्या तृतीय वर्ष वर्गाची सुरुवात झाली. सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले. यावेळी सहसरकार्यवाह व्ही.भागय्या, अखिल भारतीय संपर्क प्रमुख व वर्गाचे सर्वाधिकारी अनिरुद्ध देशपांडे, अखिल भारतीय सह शारीरिक प्रमुख व वर्गाचे पालक अधिकारी जगदीश प्रसाद, संघ शिक्षावर्गाचे कार्यवाह भारत भूषण, पालक अधिकारी जगदीश प्रसाद, मुख्य शिक्षक गंगाराजीव पांडे, सहमुख्यशिक्षक हे प्रामुख्याने. भय्याजी जोशी यांनी देशभरातून आलेल्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. यावेळी संघ शिक्षा वर्ग ही स्वयंसेवकांच्या जीवनातील एक सुवर्णसंधी असते. येथे आलेले कार्यकर्ता निवडपद्धतीने येतात. या वर्गात शारीरिक, बौद्धिक शिक्षणासोबतच स्वत:चे आत्मचिंतनदेखील आवश्यक आहे. जितके जास्त आत्मचिंतन आपण करु, तेवढीच जास्त प्रगती होईल. देशाच्या प्रगतीसाठी व्यापक दृष्टी असणे आवश्यक असते. अखिल भारतीय दृष्टी असणे आणि अखिल भारतीयतेचा अनुभव होणे या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत. स्वयंसेवक असल्यामुळे भारतीय दृष्टी तर आपल्याला प्राप्त होते. मात्र या वर्गात अखिल भारतीयतेचा अनुभव येईल व दृष्टीत व्यापकता येईल, असे भय्याजी जोशी म्हणाले.यावेळी भय्याजी जोशी यांनी शिक्षणाच्या प्रक्रियेवर भाष्य केले. जे ऐकले त्याला समजून घेणे व त्याचे आकलन होणे महत्त्वाचे आहे. ज्याचे आकलन झाले, त्याचा मनाने स्वीकार करणे व आचरणात आणणे आवश्यक आहे., असे ते म्हणाले. यावेळी सहमुख्य शिक्षक के.प्रशांत, बौद्धिक प्रमुख कृष्णा जोशी, सह बौद्धिक प्रमुख सुरेश कपिल, सेवा प्रमुख डॉ. उपेंद्र कुलकर्णी, व्यवस्था प्रमुख रवींद्र मैत्रे हेदेखील उपस्थित होते. यंदाच्या संघशिक्षा वर्गात ८२८ तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. तृतीय वर्ष वर्गाचा समारोप १६ जून रोजी होणार आहे.स्वयंसेवकांमध्ये उत्साहदरम्यान, भाजपाच्या विजयामुळे स्वयंसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. भर उन्हाळ्यात प्रशिक्षण सुरू असतानादेखील स्वयंसेवक निकालाची माहिती घेत होते. निकालांचा आनंदोत्सव साजरा झाला नाही, मात्र उत्साह दिसून आला. देशातील वेगवेगळ्या भागातून आलेले स्वयंसेवक प्रशिक्षण आटोपल्यानंतर निवांत वेळी आपापल्या प्रदेशातील राजकारणावर चर्चा करताना दिसून आले.
आत्मचिंतनातूून उघडतात प्रगतीची दारं : भय्याजी जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 10:44 PM
एकीकडे लोकसभा निवडणुकांच्या निकालांचा भाजपाच्या गोटात उत्साह असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी तृतीय वर्ष वर्गामध्ये व्यस्त दिसून आले. डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात निकालांच्या दिवशीच संघाच्या तृतीय वर्ष वर्गाची सुरुवात झाली. सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले.
ठळक मुद्देनिकालाच्या दिवशीच तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाची सुरुवात