नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह नेमके कुठे आहेत? यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केला होता. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे.
आज देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अतिवृष्टीसंदर्भात बोलताना राज्य सरकारवर निशाणा साधला, सोबतच पटोले यांनाही टोला लगावला. “नाना पटोले काहीही बोलत राहतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देता येणार नाही. पटोले हे असे व्यक्ती आहेत की ते अमेरिकेच्या अध्यक्षांच्या बाबतीतदेखील बोलू शकतात”, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, मराठवाड्यात अतिवृष्टीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेवरही फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली. सरकारच्या सर्व घोषणा हवेत असतात, शेतकऱ्यांबद्दल अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. फक्त सरकारने केलेल्या घोषणा कागदपुरत्या राहिल्या आहेत. वास्तवात त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्याही नाहीत. मात्र, आम्ही उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहोत. शेतकऱ्यांची परिस्थिती सरकारपर्यंत पोहचवून जास्तीत जास्त मदत मिळवण्याचा प्रयत्न करू, असेही फडणवीस म्हणाले.
नाना पटोलेंनी केली होती केंद्र सरकारवर टीका
मुंबईत गांधी भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन नाना पटोले यांनी मोदी सरकारवर आरोप केला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह परदेशात फरार झाले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले, परमवीर सिंह यांना त्याचवेळी ताब्यात घेतले असते तर अनेक गंभीर विषयांची माहिती मिळाली असती. आता ते परदेशात पळून गेले असावेत अशी तपास यंत्रणांना शंका असली तरी परमवीर सिंह यांना देशाबाहेर पाठवण्याची व्यवस्था केंद्र सरकार मार्फतच केली गेली आहे का? असा प्रश्न पटोले यांनी केला होता.