नागपूर : शिवसेना उपनेते व मुंबई महापालिकेच्या स्थायी समीतीचे अध्यक्ष राहिलेले यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्याकडे प्राप्तिकर विभागाने छापेमारीची कारवाई केल्यानंतर चौकशी सुरू आहे. या प्रकरणावरून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुंबईतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा उल्लेख करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. यशवंत जाधव यांनी कोविडच्या काळात मालमत्ता खरेदी केल्या आहेत. २४ महिन्यांत ३८ प्रॉपर्टी त्याही कोविडच्या काळात, म्हणजे आम्ही आधीच म्हणत होतो कि कोविडच्या नावावर मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार सुरू आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही होत न्हवतं हे आता स्पष्ट झाले आहे अशी टीका फडणवीस यांनी केली. तसच, यासंदर्भात आयकर विभाग योग्य चौकशी करेल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्याकडे प्राप्तिकर विभागाने केलेल्या चौकशीत १२ शेल कंपन्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. प्राप्तिकर विभागाने २५ फेब्रुवारीपासून यशवंत जाधव कुटुंबीयांसह त्यांचे निकटवर्तीयांच्या ३३ ठिकाणी छापेमारी केली.
या छापेमारीत १३० कोटी रुपयांपेक्षा अधिक स्थावर मालमत्ता आढळून आली आहे. यातच, जाधव व त्यांच्या निकटवर्तीयांनी गेल्या दोन वर्षांत ३६ मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाने केलेल्या छापेमारीत महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली असून, यामध्ये एक डायरी मिळाली आहे. या डायरीत, ५० लाखांचे घड्याळ दिले असून, गुढी पाडव्याच्या दिवशी सुमारे २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू मातोश्रीला दिल्याची नोंद आढळून आल्याचा दावा करण्यात येत आहे.
यशवंत जाधव यांनी दावे फेटाळले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचे नाव मातोश्री आहे. यामुळे असा काही व्यवहार झाला आहे का, याचा तपास आता केला जात आहे. मात्र, यशवंत जाधव यांनी सदर दावे फेटाळले असून, आपल्या आईला या महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्याचे म्हटले आहे.