नागपूर : राणा दाम्पत्याचे आज दिल्लीहून नागपुरात आगमन झाले. अमरावतीला जाण्यापूर्वी त्यांनी नागपुरातील रामनगरमधील हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे पठण केले. दरम्यान, राणा दाम्पत्याने महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीकाही केली. या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
राणा दाम्पत्य नागपुरात आल्यावर काय घडले, याची मला कल्पना नाही. मात्र, देशात असो वा राज्यात कुठेही हनुमान चालीसा म्हणण्यावर बंदी नाही आणि येऊही शकत नाही. पण, जर कुठे अशी बंदी येत असेल तर ते योग्य नाही. कोण कोणाला काय म्हणाले, हे मला ठाऊक नाही, पण सर्वांनी बोलताना योग्य भाषेचा वापर करावा, असे मत फडणवीसांनी व्यक्त केले.
सामनाच्या अग्रलेखातून केंद्रावर टीका करताना सरकार मसनात जाईल असे म्हटले आहे, यावर प्रश्न विचारला असता, राज्यात असा कायदा आहे की, मुख्यमंत्री किंवा सत्तारुढ पक्षाविरुद्ध एक अक्षर जरी बोललं तर तुम्हाला किमान ५-१० ठिकाणी तक्रारी होऊन त्याला जेलमध्ये जावे लागते. पण, देशाच्या पंतप्रधानांविरुद्ध कुणी बोलले तर त्याचा सन्मान होतो, ही आता महाराष्ट्राची परंपरा होत चालली आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.