नागपूर : राज्यातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला होणार आहे. सध्या हे प्रकरण ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच राहणार आहे. ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण जाणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीत स्पष्ट केलं केल्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांना प्रतिक्रिया देताना ठाकरे गट वेळकाढूपणाचे धोरण आखत असल्याचा आरोप केला. तसेच संजय राऊत यांनाही टोला लगावला.
फडणवीस म्हणाले, नबाम राबियाचा जो काही निर्णय आहे त्यावर पुनर्विचार व्हावा म्हणून ७ जजेसकडे प्रकरण पाठवा ही मागणी काही संयुक्तिक नाहीये. मेरिटवर आम्ही पूर्ण केस ऐकू त्यानंतर गरज वाटल्यास अंतिम निर्णय द्यायचा की ७ जजेसकडे पाठवायचं ते आम्ही ठरवू, असंही न्यायालयाने नमूद केलं आहे.
उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे. ती वेळकाढूपणाचे धोरण आखत आहे. वर्षभर या प्रकरणाचा निकालच लागू नये. अशी त्यांची इच्छा आहे. मात्र आता याची नियमित सुनावणी होत आहे. अंतिम निकाल लवकरच लागेल, असंही फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले.
राऊतांच्या आरोपावर फडणवीस म्हणाले..
मला तुरुंगात जीवे मारण्याचा कट होता, या संजय राऊतांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, संजय राऊत काहीही आरोप करू शकतात, ते दिवसातून तीनवेळा आरोप करतात. सकाळी कोणता आरोप केला हे त्यांच्या संध्याकाळी लक्षात राहत नाही. त्यामुळे यावर मी काय बोलणार असा उपहासात्मक टोला फडणवीस यांनी लगावला.