लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पत्रपरिषदे दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. जे लोक रोज लोकशाहीबाबत ओरड करतात, ते सभागृहात केवळ ४६ मिनिटे उपस्थित होते. यावरून त्यांचे लोकशाहीवर खरोखर किती प्रेम आहे, हे लक्षात येते, अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरेंबाबत वक्तव्य केले.
विरोधकांनी विविध माध्यमांतून आरोप केले. आम्ही त्यांना उघडे पाडले. आदित्य ठाकरे यांनी वयाचा दाखला देत काही आरोप केले. आम्ही त्यांच्या वडिलांनाच घाबरलो नाही, तर त्यांना काय घाबरू? त्यांच्या नाकाखालून ५० आमदार काढले, तेव्हा मुंबईत आग लागेल, असे इशारे देण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात आगपेटीची काडीही पेटली नाही, असे फडणवीस म्हणाले.
विरोधकांनी तारतम्य बाळगावे: मुख्यमंत्री
यंदाच्या अधिवेशनात विरोधक सभागृहापेक्षा बाहेरच जास्त बोलले. विविध मुद्दे उकरून काढत त्यांनी विविध आरोप करण्याचे प्रयत्न केले. मात्र, ते यशस्वी होऊ शकले नाहीत. विरोधकांनी कमीतकमी अध्यक्षांबाबत बोलताना तरी तारतम्य बाळगावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"