नागपूर-
राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आज विधानसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेला आणि प्रश्नांना उत्तर दिलं. यावेळी फडणवीसांनी अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सुनित्रा पवार यांचा उल्लेख करत मिश्किल टिप्पणी केली. "अजित दादांनी सांगितलं की अमृताशी बोला. पण हे बोलताना तुम्ही सुनेत्रा ताईंना विचारलं होतं का?", असं फडणवीस म्हणाले आणि सभागृहात हशा पिकला.
"आता मी अमृता वहिनींनाच सांगणार आहे बघा जरा...", अजित पवार यांचा फडणवीसांना चिमटा
राज्याच्या मंत्रिमंडळात महिला मंत्री नसल्याच्या मुद्द्यावर बोलत असताना अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं होतं. "कुणी कितीही काही बोललं तरी भाजपामध्ये फडणवीसच ताकदवान आहेत. पण राज्याच्या मंत्रिमंडळासाठी एक महिला नेता मिळत नाही हे दुर्देव आहे. आता मी अमृता वहिनींनाच फोन करुन सांगणार आहे यांच्याकडे जरा बघा", असं अजित पवार काल विधानसभेत म्हणाले होते. त्यावर आज फडणवीसांनी उत्तर दिलं.
काय म्हणाले फडणवीस?विरोधकांनी केलेले आरोप आणि प्रश्नांना उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भाषणाच्या सुरुवातीलाच अजित पवारांना लक्ष्य केलं. "अजित दादांनी सांगितलं की एकदा अमृताशी बोला, पण दादा हे बोलताना तुम्ही सुनेत्रा ताईंना विचारलं होतं का?", असं फडणवीस म्हणाले.
शरद पवारांनी संधी असूनही मुख्यमंत्री केलं नाही"अजित पवार यांनी आपल्या भाषणात अनेक गोष्टींची चर्चा केली. कोण मुख्यमंत्री झाले, कोण उपमुख्यमंत्री झाले. पण एका गोष्टीचं मला दु:ख आहे. संधी असतानाही तुम्हाला पवार साहेबांनी मुख्यमंत्री केलं नाही. २००४ ला संधी होती. तुमचे जास्त लोक निवडून आले होते. तुमच्या करारानुसार ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होता. पण ही संधी काही तुम्हाला मिळाली नाही", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.