नागपूर : दिल्ली वारीवरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलयं. फडणवीस म्हणाले, नाना पटोले ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्या पक्षात प्रात:विधीला जायचं असेल तर हाय कमांडची दिल्लीवरून परवानगी लागते. त्यामुळे आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही दिल्लीला गेलो तर काय वाईट आहे, असे खोचक प्रत्युत्तर फडणवीस यांनी विरोधकांना दिलं आहे.
राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर यांचा दौरा तपासला तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली वारी मध्येच जास्त वेळ घालवतात. राज्याच्या जनतेकरिता फक्त घोषणा देणे, दिल्लीवाले पंतप्रधान देशासाठी घोषणा करतात तसे हे राज्य वाले राज्यात घोषणांचा पाऊस पाडण्याचं काम करतात. यांना कायम दर दोन दिवस आड दिल्ली मध्ये बोलाविले जाते आणि त्या दिल्ली दरबारी हुजरेगिरी करण्याचा काम राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतात अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. यावर फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता.
दिल्लीला गेल्यानंतर चर्चा सुरू झाली की मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून केव्हा होणार हे मुख्यमंत्री ठरवतील आणि स्पष्ट करतील असे उत्तर फडणवीस यांनी दिले.भाजप-शिवसेना एकत्रित निवडणुका लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.