नागपूर : जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे इसासनी परिसरातील नाल्याला आलेल्या पुरात माय-लेकी वाहून गेल्याची घटना समोर आली होती. ही दुर्घटना ताजी असतानाच, आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावनेर तालुक्यात एका नाल्यावरून 7 जण गाडीसहित वाहून गेल्याची दुर्घटना घडली. यातील तीन जणांचे मृतदेह सापडले असून या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून आपण नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. सततच्या पावसाने नदी-नाले तुडूंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूर परिस्थीती आहे. अशातच, सावनेर तालुक्यातील नांदा ते छत्रपूर दरम्यानच्या नाल्यावरून पाणी वाहत असताना गाडी काढण्याच्या नादात ती गाडी ७ जणांसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. ही घटना आज (दि. १२) दुपारी ३ च्या सुमारास घडली. त्या स्कॉर्पिओमध्ये तीन महिला, दोन पुरुष, १० वर्षाचा मुलगा व वाहनचालक असे एकूण सात जण असल्याची तसेच यातील दोन महिला व एका एक पुरुष अशा तिघांचे मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. ते सर्व जण मुरुड, ता. मुलताई, जिल्हा बैतूल (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहेत. दरम्यान, फडणवीस यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
नागपूर जिल्ह्यातील नांदागोमुख छत्रापूर येथील पुलावरुन एक वाहन कोसळल्याने त्या वाहनातील सहा जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटनेत काही लोकांचे मृत्यू झाल्याचे ऐकून दु:ख झाले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे युद्धपातळीवर केला जात असून एनडीआरएफची सुद्धा मदत घेतली जात आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, नागपूर जिल्हाधिकार्यांशी यासंदर्भात मी संपर्कात आहे. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
व्याही भोजनासाठी आले होते
नांदागोमुख, ता. सावनेर येथील सुरेश ढोके यांच्या मुलीचे काही दिवसांपूर्वी लग्न झाल्याने ते सर्व जण सुरेश ढोके यांच्याकडे व्याही भोजनासाठी आले होते. भोजन आटोपल्यानंतर पाऊस सुरू असताना ते स्कॉर्पिओने (एमएच-३१/सीपी-०२९९) मुलताईकडे जायला निघाले. दरम्यान, नांदागोमुख-छत्रापूर मार्गावरील मोठ्या नाल्यावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना चालकाने पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. स्कॉर्पिओ काही दूर जाताच प्रवाहात अडकली आणि वाहून गेली. माहिती मिळताच केळवद पोलिसांनी घटनास्थळ गाठून शोधकार्य सुरू केले.