नागपूर : कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद जो काही सुरू आहे त्यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आंदोलन ठेवण्यात आले होते. परंतु, कर्नाटकच्या सरकारने त्याला परवानगी नाकारली. महाराष्ट्रातील काही नेते तेथे गेले असता त्यांना निर्बंध घालण्यात आले. आवागमनासाठी कुठलाही निर्बंध घालण्यात आलेला नाही, असा दोन्ही राज्यांनी निर्णय घेतला आहे. शांतीपूर्वक आंदोलन होत असेल तर निर्बंध घालण्याची गरज नाही. तरीही आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू तसेच कर्नाटकमध्ये जे काही मराठी बांधव आहेत त्यांच्या पाठीशी आमचे सरकार उभे आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या ट्विटसंदर्भात होणाऱ्या आरोपांवर प्रतिक्रिया फडणवीस म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर ते ट्विट त्यांचे नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोणीतरी फेक हँडलवरुन ते ट्विट केले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा विषय फार ताणून धरला जाऊ नये. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर येऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यावर फडणवीस म्हणाले, विरोधीपक्ष आपलं अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा मुंबईचा मोर्चा नॅनो मोर्चा ठरल्यामुळे ते नागपुरात आत्मचिंतन करत आहेत. आपलं अस्तित्व मीडियाच्या माध्यमातून लोकांपुढे गेलं पाहिजे म्हणून त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. मोर्चासंदर्भात मी नॅनो असल्याचं बोलल्यानंतर काल एकप्रकारे मराठा मोर्चाचा व्हिडीओ दाखवून संजय राऊत यांनी ट्विट केलं, त्यातूनच असं लक्षात येतयं की त्यांचा मोर्चा नॅनो होता. विरोधकांवर मानसिक परिणाम झालाय म्हणून ते असं करत आहेत, असा टोला त्यांनी विरोधकांना हाणला.
सामनावर मिश्कील टिप्प्णी
एकनाथ खडसेसंदर्भात अजुनही तुमचा सामना सुरू आहे का, असा प्रश्न विचारला असता, आमचा सामना कोणासोबत नाही आणि आम्ही सामना वाचतही नाही असा खोचक टोला त्यांनी यावेळी शिवसेनेला लगावला.