नागपूर : आम्ही विश्वास प्रस्ताव प्रचंड बहुमताने जिंकला. १६४ मत विरुद्ध ९९ अशी लॅन्डस्लाईड विक्ट्री आम्ही मिळवली आहे. ही टर्म आम्ही पूर्ण करू, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्राला देशातील नंबर एकच राज्य आम्ही बनवू, असेही फडणवीस म्हणाले.
आज देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, २०१९ सालीच भाजपला लोकांची पसंती मिळाली, पण चुकीच्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. या काळात मला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही याचं दु:ख नव्हतं, तर, आलेल्या सरकारने राज्याच्या विकासाची कामे केली नाही. तसेच, मराठवाडा तसेच दुष्काळग्रस्त भागातील कामेही अडली होती. ते पाहून चिंता वाटायची, याहीवेळेस सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. कोरोनाच्या काळातही जीवाची पर्वा न करता काम केलं, असे फडणवीस म्हणाले
गेली अडीच वर्ष ही सरकार रामभरोसे चालत होते. राज्यात भ्रष्टाचाराचा सुळसुळाट होता. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात जी विकासाची गाडी चालत होती त्याच इंजिन मध्येच बंद पडले आणि राज्याच्या विकासाची गाडी रुळावरून खाली गेली होती. यातून आम्हाला मार्ग काढायचा होता व त्यासाठी आम्ही संघर्ष केला. ही विकासाची गाडी आम्ही परत रुळावर आणणार असे सांगतानाच ही सत्तेची नाही तर विचारांची लढाई आहे, असेही फडणवीस बोलताना म्हणाले.
शिवसेनेचाच मुख्यंमत्री होणार असा निर्णय भाजपकडून घेण्यात आला व एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी पुढाकार घेतला. आपण बाहेर राहून या सरकारला मदत करायची माझी तयारी होती, तसं सांगितलंही होतं, पण वरिष्ठांनी सांगितल्यानुसार मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाचा प्रवास पूर्ण होणारच, आम्ही मिळून काम करू आणि पुढील अडीच वर्ष हे सरकार चालेल आणि आम्ही यशस्वी कामगिरी करून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासह सरकार आलेलं आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा भागातील प्रश्नांना मार्गी लावू आणि समस्याग्रस्त भागांच्या विकासाच्या दृष्टीने कार्य करू, असे फडणवीस म्हणाले. आज जे काही यश मिळालं आहे ते पंतप्रधान मोदी व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामुळेच मिळालं असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं.
हे रिक्षावाल्यांच सरकार म्हणणाऱ्यांना जबर टोला
हे रिक्षावाल्यांच सरकार अशी टीका नव्या सरकारवर करण्यात येत असलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी सणसणीत टोला लावत, ज्यांनी मोदींजींना चायवाला म्हणून हिणावलं त्यांच्यावर आज पाणी पिण्याची वेळ आली आहे, असे उत्तर दिले. त्यामुळे कुणी आम्हाला रिक्षावाले म्हणून हिणवत असेल तर आम्हाला त्याचा आनंदच आहे. असे फडणवीस यावेळी म्हणाले.
वैचारिक वारसा सुद्धा महत्त्वाचा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर ठामपणे उभी राहणारी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. पारिवारिक वारसा हा उद्धव ठाकरे यांच्याकडे असला तरी वैचारिक वारसा सुद्धा महत्त्वाचा असतो. हा वैचारिक वारसा घेऊन एकनाथ शिंदे पुढे जात आहेत, असे फडणवीस म्हणाले.
पूरस्थितीकडे पूर्ण लक्ष
राज्यातील पूरस्थितीकडे आमचे पूर्ण लक्ष आहे. आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आम्ही घेतली आहे. मी स्वत: काल रायगड जिल्हाधिकार्यांशी सातत्याने संपर्कात होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा सातत्याने सर्व यंत्रणांशी संपर्कात आहेत, असे त्यांनी सांगितले.