नागपूर : नागपूरमधील ॲड. सतीश उके यांच्या घरी गुरुवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापा टाकला. कारवाईदरम्यान सतीश उके आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मोबाइल, लॅपटॉप ईडीने जप्त केले आणि कागदपत्रांची पाहणी केली. सहा तास कसून चौकशी केल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी ॲड. सतीश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके यांना अटक केली. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मला या प्रकरणाची काही कल्पना नाही, मी देखील माध्यमांमध्येच बघितलं आहे की, जमीनीच्या प्रकरणांमध्ये नागपूर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मूळ तक्रार ही नागपूर पोलिसांची असून त्याच्याआधारे ईडीने कारवाई केली आहे. त्यांच्यावर २००५ पासून विविध एफआयआर दाखल आहेत. त्यांना न्यायाधिशांची खोटी तक्रार केल्याप्रकरणीही शिक्षा झालेली आहे. त्यामुळे, जे काही कायदेशीर आहे ते कायद्याने होईल, आणि तेच ईडी करतेय, असे फडणवीस म्हणाले. आज नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल या कारवाईवरून भाजपवर निशाणा साधला होता. भाजपच्या हिटलरशाहीने लोकशाही धोक्यात असल्याचे पटोले म्हणाले होते. भाजपच्या अत्याचारी व्यवस्थेविरोधात जो कोणी बोलेल, त्याच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करुन कारवाई करुन तोंड बंद करण्याचं पाप हे भाजप जाणीवपूर्वक करतंय. केवळ सतीश उके प्रकरणातच नाही तर अनेक प्रकरणात अशी कारवाई केली जात असल्याचेही पटोले म्हणाले.
काय आहे प्रकरण
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधातील प्रकरणामध्ये काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचे वकील असलेल्या अॅड. सतीश उके यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला. त्यांच्या घराची झाडाझडती करण्यात आली. कारवाईदरम्यान सतीश उके आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मोबाइल, लॅपटॉप ईडीने जप्त केले आणि कागदपत्रांची पाहणी केली. सहा तास कसून चौकशी केल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी ॲड. सतीश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके यांना अटक केली.
पुरावे नष्ट करण्यासाठी धाड टाकल्याचा आरोप
लॅपटॉपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धच्या केसेस, भविष्यातील केसेस आणि न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरण, निमगडे खून प्रकरणाचे पुरावे होते. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील आमच्याकडे असलेले पुरावे नष्ट करण्यासाठीच ही धाड घातली असल्याचा आरोप प्रदीप उके यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला.