नागपूर : राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी शिवसेनेने संजय पवार यांचे नाव निश्चित केले. यानंतर संभाजीराजे समर्थकांनी दगाफटका झाल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत हेच याला कारणीभूत असल्याचे म्हणत संताप व्यक्त केला. आता यावर भाजपकडून प्रतिक्रिया आली असून देवेंद्र फडणवीसांनी यावरून राष्ट्रवादी व शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
आधी शरद पवारांनी हा सगळा विषय सुरू केला. त्यानंतर वेगळ्याच दिशेनं हा विषय गेला व आता एक वेगळ्या प्रकारचा हा सर्व विषय झालेला आहे. कदाचित संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न यातून असावा. पण तो त्या-त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर मी बोलण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
यासह फडणवीसांनी इंधन दर व महागाईच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित करत शरद पवारांना टार्गेट केले. सगळ्यात जास्त महागाई वाढवण्याचं काम आघाडी सरकार करत आहे. पेट्रोल-डिझेलवर राज्याचा कर २९ रुपये व केंद्राचा कर १९ रुपये आहे. राज्याचा कर ते का कमी करत नाहीत? आधी शरद पवारांनी यावर बोलावं. यासह २९ रुपये कर पेट्रोल-डिझेलवर लावून एक रुपयाही कमी न करता हे लोक महागाईवर कसे बोलू शकतात? याचं मला आश्चर्य वाटतं, असेही फडणवीस म्हणाले.
मराठा संघटनांचे आरोप काय...
राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी शिवसेनेने संजय पवार यांचे नाव निश्चित केले. त्यानंतर विविध मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी मुंबईत संभाजीराजे यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना या प्रतिनिधींनी शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर खापर फोडले. शरद पवार यांनी सुरुवातीला संभाजीराजे यांना पाठिंबा दिला होता, तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पुरस्कृत उमेदवारीला मान्यता दिली होती. संभाजीराजे यांना शिवबंधन बांधण्यास अडचण असल्यास पुढे कोणत्या पद्धतीने काम करायचे, याचा मसुदाही अंतिम करण्यात आला होता. या मुसद्यालाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंजुरी दिली होती. अटी मान्य झाल्याचे सांगितले गेले होते. मात्र, ऐनवेळी यात झालेला बदल हे राऊत यांचे पाप आहे, असा आरोप छावा संघटनेचे धनंजय जाधव यांनी केला.