नागपूर - नोटबंदी निर्णयानंतर देशात चलनात आलेली २ हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अचानक जाहीर केला. या नोटा बदलून घेण्यास अथवा बँकेत जमा करण्यास नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या निर्णयावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तू तू मै मै सुरू झाली आहे. या निर्णयाचं सत्ताधारी समर्थक करत आहेत. तर, विरोधकांनी यावरुन मोदी सरकारवर जबरी टीका करण्यास सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनपढ म्हणत मोदींना लक्ष्य केलं. तर, राज ठाकरे यांनीही हा निर्णय देशाला नुकसान पोहोचवणार असल्याचं म्हटलंय. आता, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज ठाकरे यांना फटकारलं आहे. राज ठाकरेंनी या निर्णयाला विरोध केला आहे, तर राष्ट्रवादीने या निर्णयाविरुद्ध आरबीआय कार्यालयाबाहेर निदर्शने सुरू केली आहेत. त्यावरुन, आता फडणवीसांनी पलटवार केलाय.
ऑक्टोबरपर्यंत या नोटा तुम्हाला बदलता येतील. ज्यांच्याकडे कायदेशीर नोटा आहेत, ज्यांच्याकडे पांढरा पैसा आहे, त्यांना चिंता करण्याची गरज नाही. कोणी काळा पैसा जमा करुन ठेवला असेल तर त्यांना त्रास नक्कीच होणार आहे. कारण, त्यांना हे सांगावं लागेल की इतक्या नोटा आल्या कुठून?, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज ठाकरे यांच्या या नोटबंदीचा विरोध केल्यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना राज ठाकरेंना एकप्रकारे टोलाच लगावला आहे.
२००० रुपयांची नोट बंद करण्याचा किंवा नोटाबंदीचा फायदा हा, बाजारात सर्वात मोठ्या फेक नोटा आयएसआय (ISI) च्या माध्यमातून वापरात आणल्या जातात, त्यांना रोखण्यासाठी होतो, त्यांचा डाव उधळण्यासाठी या निर्णयाचा फायदा होतो. यापूर्वीच्या नोटबंदीवेळीही ती गोष्ट आपल्याला प्रामुख्याने जाणवली. जे इन्पुट मिळाले, त्यानुसार फेक करन्सीवर आपण बंदी घालू शकलो, असेही फडणवीसांनी म्हटले.
हे निर्णय देशाला परवडणारे नसतात
हा धरसोडपणा आहे. तज्ज्ञांना विचारुन हा निर्णय झाला असता तर ही वेळ आली नसती. आता लोकांनी परत बँकेमध्ये पैसे टाकायचे, परत तुम्ही नवीन नोटा आणणार, असं सरकार चालतं का? असे प्रयोग होतात का?, असा निशाणा राज ठाकरेंनी लगावला. त्यावेळी जेव्हा नोटा आणल्या होत्या तेव्हा त्या एटीएममध्येही जात नव्हत्या. म्हणजे नोटा एटीएममध्ये जात आहेत की नाहीत हे देखील पाहिलं नव्हतं. नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. ३० सप्टेंबरपर्यंत नोट चलनात
दरम्यान, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा एका रात्रीत बंद केल्या होत्या. त्यावेळीही नोटा बदलून घेण्यास वेळ दिला होता. यावेळी २ हजारांच्या नोटेच्याबाबतीत मात्र नोटा थेट बंद न करता ही नोट ३० सप्टेंबरपर्यंत चलनात कायम ठेवली आहे. तोवर त्या बँकांत जमा करता येतील. ३० सप्टेंबरनंतर काय? याबाबत आरबीआयने अद्याप काही म्हटलेले नाही.