नागपूर - भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे. वैदिक गणिताच्या खंडाद्वारे हे ज्ञान नव्याने समाजासमोर येणार आहे. या वैदिक गणिताची महती व उपयोग येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्याकरिता भारती कृष्ण विद्या विहार येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र उभारले जावे, अशा अपेक्षा व्यक्त करत याला शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विश्व पुनर्निर्माण संघ संचलित भारती कृष्ण विद्या विहार शाळेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आद्य शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज लिखित वैदिक गणिताच्या दोन खंडांचे प्रकाशन झाले.
मुख्यमंत्री म्हणाले, आद्य शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज यांनी वेद ऋचांचा अभ्यास करून सोप्या पद्धतीने संपूर्ण गणिताची मांडणी वैदिक गणित खंडांमध्ये केली आहे. केंद्रीय माध्यमिक मंडळाच्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे. या खंडांच्या माध्यमातून वेदांमधील ज्ञानाचा साठा शंकराचार्यांनी शोधला आहे.
वैदिक गणिताचा विचार हा विश्व कल्याणासाठी : डॉ. मोहन भागवतसरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, मानवी जीवनात अनेक प्रसंगांमध्ये गणना, आकडेवारीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्राचीन भारतीय परंपरेतून आलेल्या वैदिक गणिताचा विचार हा विश्व कल्याणासाठी आहे. जगात अध्यात्मावर आधारित घडत असलेल्या विविध परिवर्तन आणि पुनर्रचनेमध्ये वैदिक गणितही महत्त्वाची भूमिका निभावू शकते आणि जगाला सुखी व समृद्ध बनवण्यातही मोलाचे योगदान देऊ शकते.