नागपूर: उद्योग व्यवसाय तुलनेने कमी असणाऱ्या विदर्भ, मराठवाडा या भागात उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या समूहांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करणारा पॅटर्न महाराष्ट्रात लवकरच राबविला जाईल, असे सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रांगणात खासदार औद्योगिक महोत्सव अर्थात ॲडव्हाँटेज विदर्भ या तीन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. विदर्भातील मोठ्या उद्योगांचे प्रदर्शन तसेच उद्योजकांचे संमेलन यानिमित्ताने आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
खासदार औद्योगिक महोत्सव नागपूर अर्थात ॲडव्हांटेज विदर्भ उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी निर्माण केलेले व्यासपीठ असून विदर्भातील मोठया उद्योग समूहाचे प्रदर्शन आणि गुंतवणुकीचे संमेलन सध्या नागपूर येथे सुरू आहे. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट यांच्यामार्फत या विचार मंथनाचे व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. मंचावर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी,सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार,नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, व्हीएनआयटीचे संचालक प्रमोद पडोळे, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, खासदार अनिल बोंडे,माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल,माजी खासदार व उद्योजक अजय संचेती,आमदार आशिष जायस्वाल,नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी गुंतवणुकदारांशी संवाद साधला. ते म्हणाले,उद्योग व्यवसायामध्ये सर्वाधिक महत्वाचा वीजपुरवठा असून अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात उद्योग व्यवसाय उभारताना यामध्ये सवलत मिळण्याची मागणी योग्य आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या संदर्भातील एक पॅटर्न आम्ही तयार करीत आहोत. याचा फायदा उद्योग समूहांना होईल. मात्र, मराठवाडा-विदर्भ यासारख्या मागास भागात उभारल्या जाणाऱ्या उद्योगांनाच या पॅटर्नचा लाभ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गडकरी फडणवीस यांचे डबल इंजिन विदर्भाचा सुवर्णकाळ - नारायण राणेकार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. ते म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विदर्भाचा पूर्ण अभ्यास आहे. कुठे काय निर्माण होऊ शकते, कोणत्या जिल्ह्याला कोणता उद्योग उपयोगी पडू शकते यशस्वी होऊ शकते, याची माहिती असणारे हे नेतृत्व आहे. त्यामुळे विदर्भाच्या विकासाचा हा सुवर्णकाळ आहे. वीज, सुरक्षा,पायाभूत सुविधा आदी सर्व सुविधा विदर्भात उपलब्ध आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने विदर्भामध्ये गुंतवणूक करणे, ही गुंतवणूकदारांसाठीची सध्याची संधी आहे त्याचा लाभ घ्यावा ,असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित गुंतवणूकदारांना केले.