लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये प्रलंबित सोनेगाव येथील एका खुनासंदर्भातील याचिकेत राज्याचे माजी मुख्यमंत्री व वर्तमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. सदर याचिका वाईट उद्देशाने दाखल करण्यात आली आहे. याचिकेत आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत असे फडणवीस यांनी अर्जात म्हटले आहे. तसेच, आवश्यक बाजू मांडण्याची संधी मिळावी यासाठी याचिकेत प्रतिवादी करून घेण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे.
संबंधित याचिका अॅड. सतीश उके यांनी दाखल केली आहे. त्यावर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणात न्यायालयाने गेल्या ६ मे रोजी राज्य सरकारला नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचा आदेश दिला होता. १२ जून २०१४ रोजी सोनेगाव परिसरात एका मुलीचा मृतदेह आढळून आला होता. सोनेगावचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी कायद्यानुसार तपास केला नाही, असा उके यांचा आरोप आहे. संबंधित मृतदेह एका उत्तर भारतीय मुलीचा होता.
२०१२ मध्ये आरोपींनी त्या मुलीला चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून नागपुरात आणले होते. त्यानंतर एक वर्ष तिचे शारीरिक शोषण करण्यात आले. त्याविषयी बाहेर वाच्यता होऊ नये याकरिता त्या मुलीचा खून करून तिचा मृतदेह पुरावे नष्ट करण्यासाठी सोनेगाव परिसरातील गटारात टाकण्यात आला असे उके यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात उके यांनी १३ मार्च २०२० रोजी पोलीस आयुक्तांना आणि ६ नोव्हेंबर २०२० रोजी गृहमंत्र्यांना निवेदन सादर करून दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्या निवेदनामध्ये फडणवीस यांच्या दबावामुळे आरोपींना वाचवण्यात आले, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ते निवेदन याचिकेला जोडण्यात आले आहे.