नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुमित पिंगळे खून प्रकरणातील आरोपी देवेंद्र मांगरू जोशी याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला.
घटनेच्या एक दिवस आधी जोशीचा मुलगा निहाल व सुमित यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे सुमितने निहालला धक्काबुक्की केली होती. त्यानंतर १० जानेवारी २०२१ रोजी सुमित केश कर्तनालयात बसला असताना जोशीने त्याच्यावर लाकडी ओंडक्याने हल्ला केला तर, निहालने चाकूने वार केले. त्यामुळे सुमित जागेवरच ठार झाला. त्याचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला. वैद्यकीय तपासणीत त्याच्या शरीरावर तब्बल ३७ जखमा आढळून आल्या. न्यायालयाने ही क्रूरता लक्षात घेता जोशीला जामीन देण्यास नकार दिला. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध अजनी पाेलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. सरकारतर्फे ॲड. नितीन रोडे यांनी कामकाज पाहिले.