लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : रामटेक तालुक्यातील देवलापार व परिसरातील गावांमध्ये काेराेना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ हाेत आहे. या रुग्णांना उपचारासाठी रामटेक, कन्हान, कामठी किंवा नागपूरला न्यावे लागत असून, या चारही ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांमध्ये खाटा व ऑॅक्सिजन सिलिंडरची कमतरता असल्याने प्रसंगी रुग्णांना परत आणावे लागते. या प्रकारात काही रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. ही गंभीर समस्या साेडविण्यासाठी देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात काेविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
देवलापार परिसर आदिवासीबहुल असून, मूलभूत सुविधा व विकासाच्या बाबतीत बराच मागे आहे. या भागात प्रत्येक चार नागरिकांमागे काेराेनाचा एक रुग्ण आढळून येताे. अलीकडच्या काळात ग्रामीण भागात मृत्यूदरही वाढला आहे. या भागात प्रभावी उपचाराची साेय नसल्याने रुग्णांना इतरत्र हलवावे लागते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार करणेही शक्य हाेत नाही. देवलापार ग्रामीण रुग्णालय तसेच करवाही व हिवराबाजार प्राथमिक आराेग्य केंद्रात काेराेना चाचणीची साेय करण्यात आली आहे. देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात खासगी दवाखान्यांच्या तुलनेत रुग्णांचा ओघ कमी आहे.
मदन कोडापे, रा. सावरा, ता. रामटेक यांच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने त्यांना ऑक्सिजन लावण्यासाठी करवाही येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. मात्र, आपल्याकडे एकच ऑक्सिजन सिलिंडर असल्याचे तसेच ते आकस्मिक सेवेसाठी हवे असल्याचे सांगून त्यांना परत पाठविण्यात आले. देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात सिलिंडर नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे या भागातील रुग्णांना वाचविण्यासाठी पुरेशा ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करणेही आवश्यक आहे.
तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. चेतन नाईकवार यांच्या नेतृत्वात करवाही व हिवराबाजार प्राथमिक आराेग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी काेराेनाशी लढा देत असून, नागरिकही त्यांना साथ देत आहेत. मात्र, सुविधांचा अभाव असल्याने सर्वांचीच गैरसाेय हाेत आहे. या तुलनेत देवलापारच्या ग्रामीण रुग्णालयातील सेवा ताेकडी असल्याचेही दिसून येते. करवाही प्राथमिक आराेग्य केंद्र देवलापारपासून उत्तरेस १५ किमी तर हिवराबाजार पूर्वेस आठ किमीवर आहे. पश्चिम व दक्षिणेकडील परिसर देवलापारपासून कमी अंतरावर आहे. त्यामुळे देवलापार हे गाव मध्यवर्ती ठिकाणी असून, सर्वांच्या व सुविधांच्या दृष्टीने याेग्य आहे. या ठिकाणी काेविड केअर सेंटर सुरू करून त्यात मनुष्यबळ व साधने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
...
ही ठिकाणे याेग्य
काेविड केअर सेंटरसाठी देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयासाेबतच निमटाेला (देवलापार) येथील तंत्र माध्यमिक शाळा तसेच बेलदा व नवेगाव येथील शासकीय आश्रमशाळांच्या इमारती याेग्य असल्याची सूचना काँग्रेसचे पदाधिकारी उदयसिंग यादव यांनी पालकमंत्री डाॅ. नितीन राऊत यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. या ठिकाणी काेराेनावरील सर्व सुविधायुक्त उपचाराची साेय केल्यास ग्रामीण भागातील गरीब रुग्णांवर वेळीच उपचार करणे साेयीचे हाेईल तसेच गरिबांचे प्राण वाचण्यास मदत हाेणार असून, शहरांमधील शासकीय काेविड केअर सेंटरवरील रुग्णांचा ताण कमी हाेण्यास मदत हाेईल.
...
या भागात काेराेना संक्रमण वाढत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जात आहे. रुग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागत आहे. या भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, त्यांना शासकीय वैद्यकीय सेवेवर अवलंबून राहण्यावाचून गत्यंतर नाही. त्यामुळे देवलापार येथे काेविड केअर सेंटर सुरू करणे आवश्यक आहे.
- शाहिस्ता इलियाज पठाण
सरपंच, देवलापार.