लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळा सुरू झाल्यापासून पिपळा फाटा परिसरातील वस्त्यांना पाण्याने वेढले आहे. घराच्या सभोवताल पाणी साचल्याने नाागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे.
प्रभाग २९ मधील हुडकेश्वर मार्गावरील पिपळा फाटा लगतच्या देवनगर, सोळंकी ले-आऊट, शुभम गृहनिर्माण संस्था आदी वस्त्यातील खाली प्लाॅटमध्ये पाणी साचले आहे. या परिसरात मुरुम व गिट्टी टाकून रस्ते दोन वर्षापूर्वी तयार करण्यात आले. परंतु पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या काढलेल्या नाहीत. यामुळे पाऊस आला की परिसरातील खाली प्लाॅटमध्ये पाणी साचून राहते.
पाण्यामुळे साप, बेडूक, विंचू, खेकडे यांचा उपद्रव वाढला आहे. पाणी साचून असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. नागरिकांची चिंता वाढली आहे.
सार्वजनिक वापराच्या जागा व मैदानात पाणी साचून असल्याने मुलांना खेळता येत नाही. वृद्धांनाही घराबाहेर पडताना अडचणी येतात. यासंदर्भात आमदार टेकचंद सावरकर, प्रभागातील नगरसेवक यांच्याकडे तक्रारी केल्या, परंतु समस्या मार्गी लागलेली नाही.
परिसरातील नागरिक दिलीप वाघमारे, गणेश गंथाळे, संजय दीक्षित, नितीन लोंढे, वसंतराव डांगोरे, दिलीप डांगोरे, दिलीप गोवारकर, विजय गावंडे, प्रदीप डांगोरे, आशिष धारपुरे, आशिष कुंडलवार, संतोष पाणीकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी साचलेल्या पाण्यासंदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन दिले असून, समस्या दूर करण्याची मागणी केली आहे.