नागपूर : भक्ताच्या हाकेला धावून जाणारा आणि सेवेकऱ्यांना पदरात त्याच्या परिश्रमाचे लगेच फळ घालणारा देव म्हणून कोट्यवधी भाविकांचा लाडका विठूराया एसटी महामंडळाला पावला. लालपरी, विठाईच्या माध्यमातून पंढरीची भाविकांना वारी घडवून आणणाऱ्या एसटीच्या तिजोरीत विठूरायाने अवघ्या सात दिवसांत ५५ लाखांच उत्पन्न ओतले आहे. सवलतीच्या तिकिटांची रक्कम वगळता हे उत्पन्न ३४ लाख, २५ हजार,४४० रुपये एवढी आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठूरायांचे भक्त दोन आठवड्यांपूर्वीपासूनच पंढरीची वाट धरतात. वेगवेगळ्या गावातून पालखी घेऊन जयघोष करीत वारकरी पायीच पंढरपूरकडे निघतात. कुणी रेल्वे तर कुणी खासगी वाहनांनी पंढरी गाठतात. गावखेड्यातील गोरगरिब मंडळी सवलतीचा लाभ घेत एसटी बसेसकडे धाव घेतात. यंदा सरकारने ज्येष्ठ नागरिकांना अमृत योजने अंतर्गत मोफत प्रवासाची तर महिलांना पन्नास टक्के तिकिट भाड्यात कुुठेही प्रवास करण्याची योजना सुरू केल्याने हजारो भाविकांनी लालपरीकडे अर्थात एसटीच्या बसेसकडे धाव घेतली.
दरम्यान, सवलतीच्या प्रवास भाड्यामुळे मोठ्या संख्येत विठूरायाचे भाविक बसने प्रवास करणार असल्याचा अंदाज आल्यामुळे एसटी महामंडळाने आधीच नियोजन करून ठेवले होेते. नागपूर विभागानेही नागपूर ते पंढरपूर प्रवासासाठी पाच दिवसांच्या विशेष यात्रा बसचे नियोजन केले होते. त्यानुसार, २२ ते २६ जून या पांच दिवसांत ३३ विशेष बस नागपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या आगारातून विठाई, शिवशाही, लालपरी सोडल्या. या बसने प्रवास करून भाविकांनी पंढरपूर गाठले. लाडक्या विठोबाचे दर्शन घेऊन याच बसने भाविक नागपूर जिल्ह्यात परतले. त्यातून एसटी महामंडळाला सुमारे ५५ लाखांचे उत्पन्न मिळाले.
८,७०६ भाविकांचा प्रवासजाणे आणि येणे अशा दोन्हीकडच्या प्रवासात एसटीला ८७०६ प्रवासी मिळाले. त्यात अमृत योजने अंतर्गत प्रवास करणाऱ्यांची ७५ वर्षांवरील प्रवाशांची संख्या ८७६ (मोफत प्रवास), ज्येष्ठ नागरिकांची संख्या २३६७ तर महिला प्रवाशांची संख्या १५१४ होती. उर्वरित प्रवासी कोणत्याही सवलती शिवाय प्रवास करणारे होते.
विठ्ठल रखूमाईच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांचा प्रवास चांगला व्हावा. त्यांना जाता-येताना कसलीही अडचण किंवा त्रास होऊ नये, याची आम्ही विशेष खबरदारी घेतली होती. यामुळे आमच्या विभागाला एकूण सुमारे ५५ लाखांचे तर सवलतीची रक्कम वगळता ३४ लाख, २५ हजार, ४४० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.