नागपूर : येथील ‘जीएसटी गुप्तचर महासंचालनालय’ने (डीजीजीआय) महाराष्ट्रात कार्यरत असलेले बनावट बिलांचे मोठे रॅकेट उघडकीस आणले असून, याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्यात १५ संस्थांनी बनावट बिलांच्या आधारे २८२.३४ कोटी रुपयांचे इनपूट टॅक्स क्रेडिट लाटल्याचे समोर आले आहे.
‘डीजीजीआय’ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागपूर विभागीय शाखेने नाशिक, पालघर आणि ठाणे क्षेत्रात कार्यरत असलेल्या १५ संस्थांच्या अनेक ठिकाणांवर मागील ३-४ दिवसांत धाडी टाकल्या आहेत. या संस्था त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यांवर अस्तित्वात नसल्याचे तसेच त्यांनी व्यवसायाची बनावट कागदपत्रे अपलोड केल्याचे दिसून आले. या संस्थांचा तीन हजार कोटी रुपयांच्या बनावट इनवर्ड आणि आउटवर्ड व्यवहारात सहभागात असल्याचे आढळून आले आहे. या संस्थांनी स्वत:लाही २८२.३४ कोटी रुपयांच्या इनपूट टॅक्स क्रेडिटचा लाभ बनावट दस्तावेजांच्या आधारे घेतला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, या १५ संस्थांनी सेंद्रीय रसायने, पेंट / वॉर्निश, बोर्ड / पॅनल, प्रयोगशाळा रसायने आणि सल्फ्युरिक ॲसिड यांचा व्यवसाय कागदोपत्री दाखविला आहे. या संस्थांचे मालक अथवा भागीदार असलेले सहा लोक तपास पथकांच्या हाती लागले आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे.