लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर झोनल कार्यालयाने एका देशी मद्य उत्पादकावर धाड टाकून ३.१६ कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीचा पर्दाफाश केला आहे. अधिकाऱ्यांनी २० आणि २१ जुलैला उत्पादकाच्या नागपूर, भंडारा आणि नाशिक येथील ठिकाणी आणि कॉर्पोरेट कार्यालयावर एकाच वेळी धाडी टाकल्या.माहितीच्या आधारे संबंधित उत्पादकाने इनपुट टॅक्स क्रेडिट, मालाचा पुरवठा आणि करपात्र उत्पादनावर जीएसटीबाबत चुकीची माहिती देऊन जीएसटीची चोरी केली. मद्य उत्पादकाने अनुचित पद्धतीने १.३४ कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचा खुलासा कागदपत्रांच्या तपासणीत झाला आहे. त्यापैकी १.२८ कोटी रुपये विभागाने वसूल केले आहेत. याचप्रकारे मालाचा पुरवठा करताना ७.१८ लाख रुपयांचा जीएसटी वसूल केला, पण कागदपत्रात नोंद केली नाही. या प्रकरणात २.२७ लाख रुपये विभागाने वसूल केले आहेत. एका अन्य उत्पादनाच्या पुरवठ्यातही उत्पादकाने २४.७३ लाख रुपयांच्या जीएसटीची चोरी केली. याप्रकारे करपात्र उत्पादनांच्या पुरवठ्यावर १.५० कोटी रुपयांच्या जीएसटीचे देयसुद्धा उत्पादकाने वित्तीय वर्षात दर्शविले नाही. याप्रकारे उत्पादकाने आतापर्यंत ३.१६ कोटी रुपयांची जीएसटीची चोरी केली. त्यापैकी विभागाने १.३१ कोटी रुपये वसूल केले. विभाग देशी मद्य उत्पादकाची केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या देयसंदर्भात तपासणी करीत आहेत.
देशी मद्य उत्पादकावर ‘डीजीजीआय’ची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 10:24 PM
जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर झोनल कार्यालयाने एका देशी मद्य उत्पादकावर धाड टाकून ३.१६ कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीचा पर्दाफाश केला आहे.
ठळक मुद्दे ३.१६ कोटींची जीएसटी चोरी