सुधीर गव्हाणे यांचे प्रतिपादन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यान नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माणुसकीची मूल्ये पाळणारा समाज अपेक्षित होता. मानवी समाजात माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे. माणुसकी नसेल तर असा समाज आणि प्राणी यांच्यात कोणताच भेद राहणार नाही. म्हणून आधुनिक भारताची जडणघडण करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला, असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद विभागाचे प्रमुख आणि विचारवंत डॉ. सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा पदव्युत्तर विभागाच्यावतीने विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित डॉ. आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचा समारोप झाला. यावेळी ‘बुद्ध धम्म आणि सामाजिक परिवर्तन’ या विषयावर डॉ. गव्हाणे बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे होते. प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, व्याख्यानमालेचे आयोजक व डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे व्यासपीठावर होते. डॉ. गव्हाणे म्हणाले, जातीविरहीत समाजाच्या उभारणीसाठी आणि समताधिष्ठित देशाच्या निर्मितीकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. आर्थिक आणि राजकीय गुलामगिरीतून मुक्त होणे सोपे असते. मात्र, मानसिक गुलामीच्या विळख्यातून मुक्त होणे सहज शक्य नसते. या मानसिक परिवर्तनाचे आव्हान डॉ. आंबेडकरांनी स्वीकारले होते. त्यांच्या विचारातील आधुनिक भारत घडविण्यासाठी त्यांनी धम्माला अधिष्ठान मानले. डॉ. आंबेडकरांनी धम्मदीक्षेतून बुद्धकालीन भारत आमच्या हाती दिला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही तत्त्वे दिलीत. प्रज्ञा-शील-करुणेचे संस्कार दिले. हे संस्कार आमच्या आचरणातील अंतिम ध्येय आहे. केवळ धर्मांतरित बौद्धांनी बाबासाहेब स्वीकारल्याने त्यांची प्रगती झाली. अनुसूचित जातीतील तसेच जमातीमधील आणि इतर मागास जातींनी बाबासाहेबांच्या विचारांना स्वीकारले नाही. त्यामुळे हा समाज आजही मागासलेला आहे. त्यांची वैचारिक उंची वाढू शकली नसल्याची खंत डॉ. गव्हाणे यांनी व्यक्त केली. कुलगुरू डॉ. काणे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, डॉ. आंबेडकरांचे या देशाच्या सामाजिक परिवर्तनात विशेष योगदान आहे. या देशात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी डॉ. आंबेडकरांच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे. प्रास्ताविक डॉ. प्रदीप आगलावे यांनी केले. संचालन डॉ. रमेश शंभरकर यांनी केले. डॉ. एस.के. गजभिये यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
आधुनिक भारत निर्मितीसाठी धम्म हवा
By admin | Published: February 20, 2017 2:07 AM