उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार धम्मचक्र दिनाचा कार्यक्रम आयोजित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 08:14 PM2020-10-12T20:14:26+5:302020-10-12T20:17:15+5:30
Nitin Raut, Dikshabhoomi, highcourtधम्मचक्र प्रवर्तन दिनी लाखोंच्या संख्येने अनुयायी दीक्षााभूमीचे दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र कोरोना महामारीचे थैमान लक्षात घेता राज्य शासनाने दिलेल्या निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित केला जाईल, असे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनी लाखोंच्या संख्येने अनुयायी दीक्षााभूमीचे दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र कोरोना महामारीचे थैमान लक्षात घेता राज्य शासनाने दिलेल्या निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित केला जाईल, असे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.
याबाबत सोमवारी दीक्षाभूमी येथील आंबेडकर महाविद्यालयातील स्मारक समितीच्या कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. त्यात पालकमंत्री बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धम्मचक्र प्रर्वतन दिनाचा कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय स्मारक समितीने घेतला आहे. राज्य शासनाने कोणताही यात्रा, महोत्सव व धार्मिक स्थळ न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्मारक समितीने घेतलल्या निर्णयासोबत प्रशासन आहे. काही जण या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात गेले आहेत. प्रशासन उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी बांधील राहील. तोपर्यंत आनुषंगिक पूर्वतयारी ठेवावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त अमितेश कुमार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भन्ते आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सचिव सुधीर फुलझेले, विलास गजघाटे उपस्थित होते.
दीक्षाभूमीवरील गर्दी टाळण्यासाठी घेतलेला निर्णय योग्य
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यंदा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त १४ ऑक्टोबर व अशोक विजयादशमीच्या दिवशी २५ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीवर होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दीक्षाभूमी स्मारक समितीने घेतलेल्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले असून रिपब्लिकन पक्षांनी जाहीर समर्थन केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नागपूर प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुंभे, रिपाइं (सेक्युलर)चे प्रदेश अध्यक्ष दिनेश अंडरसहारे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शहर अध्यक्ष अरुण गजभिये आणि रिपाइं (आठवले)चे शहराध्यक्ष बाळू घरडे यांनी यासंदर्भात एक संयुक्त समर्थनाचे निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे, पावन दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनी लाखोंच्या संख्येने बौद्ध बांधव कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येतात. परंतु यंदा देशात व जगात कोरोना महामारीचे थैमान लक्षात घेता शासन -प्रशासनाची विनंती मान्य करीत स्मारक समितीने यंदा धम्मचक्र प्रवर्तनाचा सार्वजनिक समारंभ रद्द करण्याचा निर्णय घेेतला आहे. हा निर्णय जनतेचा हिताचा आहे, यात शंका नाही. बौद्ध बांधवांनी कोरोनाच्या काळात ज्या पद्धतीने बाबासाहेबांची जयंती, बुद्धजयंतीसह इतर महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या. त्याचपद्धतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करावा. १४ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर हा धम्म आचरण पंधरवडा म्हणून साजरा करावा. या निमित्ताने घरावर पंचशील ध्वज उभारून घरी व विहारात धम्माचे आचरण करावे. दीक्षाभूमीवर गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.