नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही ३ ते ५ ऑक्टोबरच्या दरम्यान धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात जवळपास ५० हजार अनुयायी बौद्ध धम्माची धम्मदीक्षा घेतील, असा विश्वास दीक्षाभूमी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी दिली.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्याला देश-विदेशातील अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. या दिनाचे औचित्य साधून भदंत ससाई मागील अनेक वर्षांपासून धम्मदीक्षा देत आहेत. आतापर्यंत लाखो बांधवांना दीक्षा दिली आहे. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा सोहळा होऊ शकला नाही.
यंदा कोरोनामुक्त वातावरण आणि कोणतेही प्रतिबंध नसल्यामुळे मुख्य सोहळ्यासाठी बौद्ध उपासक-उपासिका, धम्म बांधव आणि अनुयायी मोठ्या संख्येने दीक्षाभूमीवर येणार आहेत. यातील बहुतांश बांधव सोहळ्यासह धम्मदीक्षा घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे भदंत ससाई यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमीवर तीन दिवस धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
भिक्खू संघाचे भदंत धम्मसारथी, भदंत नागवंश, भदंत नागसेन, भदंत प्रज्ञा बोधी, भदंत धम्म विजय, भदंत महानाग, भदंत धम्मप्रकाश, भदंत मिलिंद, भदंत धम्मबोधी, भदंत नागाप्रकाश, भदंत महाकश्यप आदींच्या उपस्थितीत दीक्षा सोहळा होईल. नोंदणी केल्यानंतर दीक्षा देण्यात येणार आहे. धम्मदीक्षा घेणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.